भीमा नदीपात्राला डबक्याचे स्वरूप
By admin | Published: May 19, 2016 02:04 AM2016-05-19T02:04:54+5:302016-05-19T02:04:54+5:30
भीमा नदीपात्राला डबक्याचे स्वरूप आले असून, साधारणपणे पाच दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे.
राजेगाव : येथील भीमा नदीपात्राला डबक्याचे स्वरूप आले असून, साधारणपणे पाच दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. १९७६मध्ये उजनी धरण झाल्यानंतर ४० वर्षांत पहिल्यांदाच अशी भयानक परिस्थिती पाहण्याची दुर्दैवी वेळ राजेगावकरांवर आल्याची माहिती येथील जुने जाणकार नागरिक सांगत आहेत.
मंगळवारी (दि. १७) येथील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी यांनी एकत्र येऊन नदीपात्राची भयानक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना विनंती करून आपले विद्युत पंप बंद करण्यास सांगितले. नदीपात्रात जे काही पाणी शिल्लक राहिले आहे, त्याचा पुढील काळात गावातील जनावरांच्या व माणसांच्या पिण्यासाठी योग्य वापर करण्यात येईल, असे शेतकऱ्यांना आवाहन केले. शेतकऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा देऊन स्वत:हून कृषीपंप बंद केले. नदीपात्रात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे; त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या परिसरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पात्रातील पाणी संपल्यामुळे कृषीपंप, केबल, पाईप, विद्युत पेट्या गुंडाळून घरी नेण्यासाठी धांदल उडाली आहे.