मुंबई: मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा अखेर समजला आहे. सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलासा दिल्यानंतर परमबीर सिंग समोर येतील अशी शक्यता होती. मात्र अद्यापपर्यंत ते समोर आलेले नाहीत. मात्र त्यांनी स्वत:चा ठावठिकाणा सांगितला आहे. आपण चंदिगढमध्ये असून तपासाला सहकार्य करण्यासाठी लवकरच मुंबईला जाऊ, अशी माहिती सिंग यांनी दिली आहे.
मुंबई, ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. मार्च महिन्यापासून सिंग यांचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नाही. सिंग देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सिंग यांच्या वकिलांना त्यांचा ठावठिकाणा विचारला. त्यावर सिंग देशाबाहेर पळून गेले नसून ते देशातच असल्याचं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
न्यायालयात काय घडलं?परमबीर सिंग भारतातच आहेत. ते देश सोडून गेलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात अथवा कोर्टात हजर होतील, असं सिंग यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला. परमबीर यांनी तपासाला सहकार्य करावं, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
परमबीर सिंग देशातच आहेत. ते फरार झालेले नाहीत. मुंबई पोलिसांकडून सिंग यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळेच ते समोर येत नाहीत, असा युक्तिवाद सिंग यांच्या वकिलांनी केला. सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलासा दिल्यास सिंग पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात हजर राहतील, असं सिंग यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देत तपासाला सहकार्य करण्याची सूचना केली.