मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आगामी विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस सोडताना विधान परिषद सदरस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येत्या 7 डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास राणे अनुत्सुक असल्याचे वृत्त आहे. मात्र नारायण राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवतील आणि भाजपा त्यांना पाठिंबा देईल, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशी होणाऱ्या चर्चेनंतर राणे अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास राणेची कट्टर विरोधक असलेली शिवसेना विरोधी उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपाचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41, शेकाप - 3, बविआ - 3, एमआयएम - 2, अपक्ष - 7, सपा -1, मनसे - 1, रासपा - 1, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया -1 असे पक्षीय बलाबल आहे. त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या मतांची एकूण बेरीज 146 एवढी होते. तसेच अपक्षांसह काही छोटे पक्षही या पक्षांसोबत जाण्याची शक्यता आहे. एकट्या भाजपाकडे 122 मते असली तरी 145 मतांचा आकडा गाठणे भाजपासाठी अवघड आहे. त्यामुळे निवडून यायचे असल्यास राणेंना काही आमदारांची मते फोडावी लागणार आहे. हे एकंदरीत चित्र पाहून नारायण राणेंनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवता काही महिन्यांनंतर होणार विधान परिषदेची निवडणूक लढवून राणेंना विधान परिषदेत पाठवण्याचा विचार भाजपाकडून होऊ शकतो. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुक होत आहे. विधानसभेतील सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करतील. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २० नोव्हेंबरला या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून,२९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गुरूवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच विधान परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राणे यांनी थेट भाजपात प्रवेश करण्याऎवजी स्वतंत्र पक्ष काढला आहे. त्यानंतर त्यांचा स्वाभिमान पक्ष औपचारिकपणे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाला आहे.
नारायण राणेंच्या विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 1:02 PM