राज्य शासनाच्या येत्या १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालक, शिक्षणतज्ज्ञांचा कडाडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 08:00 PM2020-05-26T20:00:40+5:302020-05-26T20:06:45+5:30

राज्य शासनाने सद्यस्थितीत शाळा सुरू केल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाहीत.

Parents and educationists strongly oppose the decision of the state government to start schools from June 15 | राज्य शासनाच्या येत्या १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालक, शिक्षणतज्ज्ञांचा कडाडून विरोध

राज्य शासनाच्या येत्या १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालक, शिक्षणतज्ज्ञांचा कडाडून विरोध

Next
ठळक मुद्देलहान मुलांची प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका शासनाने सध्या ऑनलाईन शिक्षणावरच अधिक भर देण्याची गरज

पुणे: राज्य शासनाने सद्यस्थितीत शाळा सुरू केल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाहीत. लहान मुलांची प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. शासनाने सध्या ऑनलाईन शिक्षणावरच अधिक भर देण्याची गरज आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर अध्यादेश अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे १५ जूनपासून शाळा सुरू होतील,असे वाटत नाही,अशा प्रतिक्रिया पालक व शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे. तसेच येत्या १५ जून पासून शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला जात आहे.
राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. त्यावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी येत्या १५ जून पासून शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा मानस असल्याची भूमिका बोलून दाखविले. परंतु, पालक संघटनेचा शाळा सुरू करण्यास तीव्र विरोध आहे. कोरोनावरील लस तयार होत नाही. तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याची भूमिका इंडिया राइट्स पेरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेने घेतली आहे. तसेच सद्यस्थितीत शाळा सुरू करणे संयुक्तिक ठरणार नाही. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने किंवा विविध चॅनेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे उचित ठरेल,असे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
----------
शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या केवळ शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कशी सुरू करावी , स्वच्छतेचे नियम काय असतील, विद्यार्थ्यांनी किती अंतर ठेवून शाळेत बसावे, या संदर्भातील सूचनांचा सविस्तर अध्यादेश शासनाकडून प्रसिद्ध केल्याशिवाय शाळा सुरू होणार नाहीत,असे वाटते.
- डॉ.वसंत काळपांडे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
---------
राज्य शासनाचा १५ जूनपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय चुकीचा आहे. रेड झोन मधील शाळा बंद ठेवून ग्रीन झोनमधील शाळा सुरू केल्यास शैक्षणिक विषमता निर्माण होऊ शकते. सर्व परिस्थिती सुधारल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून शाळा सुरू करणे योग्य ठरेल. वर्षभरातील ८० सुट्ट्या पैकी ७५ सुट्ट्या रद्द करून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकेल.केवळ दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांना पाच दिवस सुट्टी देता येईल. त्यामुळे मुले सुरक्षित राहतील आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. सद्यस्थितीत शाळा सुरू करून शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांवर ताण येऊ शकतो. सध्या विविध चॅनलच्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षणावर अधिक भर द्यावा.
- डॉ. अ.ल.देशमुख , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
------------------
मार्केट, उद्याने असे सर्व काही बंद असताना शासनाचा शाळा सुरू करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. कोणताही पालक आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालू इच्छित नाही. त्यामुळे शासनाने शाळा सुरू केली तरी पालक मुलांना शाळेत पाठविणार नाहीत. आणखी काही दिवस शाळा बुडाली तरी चालेल पण; मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे.शासनाने ग्रीन झोन मधील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तरी ग्रीन झोन केव्हाही रेड अजून होऊ शकतो ,अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याची घाई करू नये.कोरोनावर लसा पडल्याशिवाय पालक मुलांना शाळेत पाठविणार नाहीत. शासनाने शाळा सुरू केल्या तर पालक बाल हक्क आयोगाकडे तक्रार करतील.
अनुभा सहाय , इंडिया राईट पेरेंट्स असोसिएशन
------------
सद्यस्थितीत शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून शासन कोरोनाला रोखण्यात शासन यशस्वी ठरले की अपयशी झाले. हे अद्याप सांगता येत नाही.लहान मुलांची प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो. त्यामुळे शासनाने आणखी काही दिवस ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवून ऑगस्ट महिन्यापासून शाळा सुरू करण्याचा विचार करावा.
-मतीन मुजावर, शिक्षण हक्क मंच

Web Title: Parents and educationists strongly oppose the decision of the state government to start schools from June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.