यवत : तृतीयपंथी असल्यामुळे कायम उपेक्षित जीवन अशा नागरिकांना जगावे लागते. भारतीय संस्कृतीमध्ये जीवनात सर्व धर्मांचे सण-उत्सव साजरे केले जातात. यात तृतीयपंथींना सहभागी होत असताना कायम वेगळा दर्जा मिळतो. मात्र, याला अपवाद ठरत आहे यवत गावातील गौरी-गणपतीचा उत्सव.यवत येथे गणेशोत्सवात सर्व जाती-धर्मांतील सलोखा तर दिसतोच; मात्र त्याचबरोबर मनुष्य असूनदेखील कायम उपेक्षित जीवन जगणारे तृतीयपंथीदेखील त्यांच्या घरात गणपतीबरोबरच गौरीचीदेखील स्थापना करतात. तसेच, त्यांच्या घरी गावातील सर्व महिला हळदी-कुंकवीसाठी जातात. तृतीयपंथी असल्याची कसलीही वेगळी वागणूक गावातील समाजाकडून त्यांना दिली जात नाही.यवतमध्ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी लोकांचा मोठा वाडा आहे. येथील वाड्यात राहणाऱ्या प्रत्येक पिढीबरोबर गावातील नागरिकांचे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. गावातील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह प्रत्येक सण-उत्सवाबरोबरच सुखदु:खांतदेखील तृतीयपंथी सहभागी होतात. यामुळे त्यांना कसलीही उपेक्षितपणाची भावना वाटत नाही. याउलट, आता नवीन पिढीमध्ये दीपा गुरू दरेकर रंजिता नायर यांनी गावात आणखी दृढ संबंध निर्माण केले आहेत.श्री गणेशाबरोबर तीन दिवस गौरींचे आगमन होते. तृतीयपंथी असलेल्या दीपा गुरू रंजीता नायर, अचल गुरू दीपा, हेमा गुरू दीपा यांनी यंदा गौरी-गणपतीची केलेली आरास खरोखर पाहण्यासारखी व नेत्रदीपक आहे. बळीराजाच्या शेतातील कष्ट करतानाचे प्रतीकात्मक देखाव्याबरोबर त्यांनी घरातील भांड्यांची आकर्षक सजावट केली आहे. दीपा गुरू या २८ वर्षांपासून गौरी-गणपतीची स्थापना करीत आहेत. त्या तीन वर्षांपासून यवतमध्ये वास्तव्यास आल्या असून, तेथेदेखील गौरी-गणपतीबरोबरच सर्वधर्मीय सण साजरे करतात. सर्व उत्सव साजरे करीत असताना गावातील लोकांचे मोठे प्रेम मिळते. यामुळे कसलाही उपेक्षितपणा जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले.>यवतमधील सर्वसमावेशकता असलेला सांस्कृतिक वारसा : यवतमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात असताना हिंदू-मुस्लिम समाजात सालोख्याचे वातवरण तर असतेच; मात्र संपूर्ण मानवी समाजात उपेक्षित म्हणून वागविल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजाला गावात सर्वसमावेशक वातावरण असते. त्यांच्या घरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गौरी-गणपतीसाठी गावातील सर्वधर्मीय महिला मोठ्या संख्येने जातात. यामुळे गावातील तृतीयपंथी वाड्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते.
‘त्यां’चाही गौरी-गणपती सणात सहभाग
By admin | Published: September 10, 2016 1:25 AM