परवानग्यांच्या गर्तेत अडकला होमिओपॅथीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 06:28 AM2020-06-06T06:28:29+5:302020-06-06T06:28:33+5:30
राज्य शासनाला अहवाल सादर : दोन आठवडे उलटूनही मान्यतेसाठी विलंब
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयुष मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी होमिओपॅथीला हिरवा कंदील दाखविला असला तरी अजूनही परवानग्यांच्या गर्तेत होमिओपॅथीचा मार्ग अडकला आहे.
राज्य शासनाने होमिओपॅथीचे तज्ज्ञ एकत्र करून टास्क फोर्स निर्माण केला. या सदस्यांनी मागील काही दिवसांत होमिओपॅथीसंदर्भात महत्त्वाची निरीक्षणे मांडून राज्य शासनाला अहवाल सादर केला; मात्र दोन आठवडे उलटूनही या अहवालाला मान्यता मिळालेली नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा विलंब कोरोनाच्या प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
इंडियन काऊन्सिल अॉफ मेडिकल रिसर्च या संस्थेने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी
उपचार पद्धतीचा प्रोटोकॉल ठरवून दिला आहे. मात्र त्यात केवळ अॅलोपॅथीचा समावेश केला आहे. एका बाजूला आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक, होमिओपॅथीला हिरवा कंदील दाखविला असताना दुसऱ्या बाजूला उपचार पद्धतीच्या प्रोटोकॉलमध्ये मात्र या पॅथींचा समावेश केला नसल्याने तज्ज्ञांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. होमिओपॅथीच्या टास्क फोर्समधील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. रुग्णांना खाट उपलब्ध होत नाही, त्यामुळे अशा स्थितीत कोणत्याही पॅथीविषयी दुराग्रह न ठेवता मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने आणि लवकरात लवकर कोरोनावर नियंत्रण मिळावे याकरिता होमिओपॅथी व आयुर्वेदाचा स्वीकार केला पाहिजे. ज्यांना या पॅथीचे उपचार घ्यायचे आहेत, त्यांना घरीच हे उपचार द्यावेत; अन्यथा कोविड रुग्णालयांमध्ये या पॅथीच्या उपचारांचा अवलंब करण्यावर भर दिला पाहिजे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास होईल मदत
आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, होमिओपॅथी, आयुर्वेदच्या उपचारांचा समावेश प्रोटोकॉलमध्ये केल्यास सर्व स्तरावर उपचारांत त्याचा समावेश करता येईल. जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे जाईल, असे टास्क फोर्समधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.