पाटेठाण : येथील ग्रामदैवत भैरवनाथांची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात ८० हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदविला. यात्रेनिमित्त ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. शनिवारी पहाटे देवाला अभ्यंगस्नान, विधिवत पूजा, पोशाख, महाअभिषेक करण्यात आला. सायंकाळी गावातून पालखी, छबिना मिरवणूक, शोभेचे दारूकाम झाल्यानंतर सार्वजनिक ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री मनोरंजनासाठी किरण कुमार ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले. रविवारी सकाळी हजेरीचा कार्यक्रम, दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा व सायंकाळी नटखट अप्सरा हा संगीत नृत्याचा कार्यक्रम पार पडला. यदां आखाड्याचे खास वैशिष्ट्य असे, की या आखाड्यात मुलींनीदेखील सहभाग घेतला. त्यांचा समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कुस्तीसाठी महाराष्ट्रातून अनेक नामवंत मल्ल व कुस्तीशौकीन उपस्थित होते. आखाड्यातील शेवटची मानाची कुस्ती राहू (ता. दौंड) येथील अक्षय नवले विरुद्ध पाटेठाण येथील अतुल हंबीर यांच्यात ११ हजार रुपये इनामासाठी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पाटील यादव यांच्या हस्ते लावण्यात आली. ही कुस्ती अखेरीस बरोबरीत सुटली. कुस्ती आखाड्यात पंच म्हणून बाबूराव घिगे, देविदास हंबीर, महादेव हंबीर, बाळासाहेब घिगे यांनी तर समालोचक म्हणून संपत हंबीर, अमोल हंबीर यांनी काम केले. या वेळी संदीप हंबीर, विठ्ठल मांढरे, पुरुषोत्तम हंबीर, सोमनाथ घाडगे, मनोज रोकडे, मनोज ववले, बापू हंबीर, भानुदास हंबीर, सुहास परांडे, भारत हंबीर, कैलास झुरुंगे, विठ्ठल हंबीर, सागर हंबीर उपस्थित होते.
पाटेठाणला रंगला कुस्त्यांचा थरार
By admin | Published: May 19, 2016 2:03 AM