सिंचन समस्येवर ‘फुटपाथ प्रदर्शन’
By admin | Published: July 28, 2015 03:14 AM2015-07-28T03:14:56+5:302015-07-28T03:14:56+5:30
विदर्भातील सिंचन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनमंच संघटनेने ‘फुटपाथ प्रदर्शन’ या अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे.
मुंबई : विदर्भातील सिंचन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनमंच संघटनेने ‘फुटपाथ प्रदर्शन’ या अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाद्वारे संघटना लोकांमध्ये जनजागृती आणून विदर्भ सिंचन महामंडळावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किनोर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत उपक्रमाविषयी माहिती दिली. किनोर म्हणाले, की विदर्भातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे, हा उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. जनमंचसोबत वेद आणि नागपूरमधील इतर सामाजिक संघटना या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या संघटनांनी एकत्र येत ‘सिंचन शोधयात्रा’ हा कार्यक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत विदर्भातील सात महत्त्वाच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. शिवाय प्रकल्पातील नेमक्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रकल्पाची सद्य:स्थिती, निकृष्ट आणि अर्धवट कामे अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडला. विदर्भ सिंचन महामंडळाने न्यायालयात खोटी माहिती दिल्याचेही निदर्शनास आले. परिणामी ही सर्व माहिती छायाचित्रांच्या रूपात फुटपाथ प्रदर्शनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जनमंच करणार आहे. या माध्यमातून सरकारचेही लक्ष वेधण्याचा संघटनेचा मानस आहे. याआधी सिंचन घोटाळ््यातील पुरावे म्हणून सहा हजार कागदपत्रे संघटनेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिले आहेत. मात्र एसीबीने एकाही अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवलेला नाही, अशी माहिती किनोर यांनी दिली.
विदर्भातील गोसेखुर्दचा उजवा कालवा, डावा कालवा, पिंपळगाव वखाजी, कार, तुरागोंदी, लोअर वर्धा, सत्रापूर, आणि अंभोरा या सात प्रकल्पांना जनमंचच्या कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. त्यातील छायाचित्रांचे प्रदर्शन मंगळवारी, २८ जुलै रोजी सीएसटी येथील आझाद मैदानावर दुपारी १२ ते ४ दरम्यान भरणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले करणार आहे.