हाती गुन्ह्याची पाटी, त्यावर लिहिलेली कलमं; डीएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 09:08 AM2018-05-09T09:08:45+5:302018-05-09T09:08:45+5:30
डी.एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचे तुरुंगातील फोटो व्हायरल झाले आहेत.
पुणे- ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असलेले डी.एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचे तुरुंगातील फोटो व्हायरल झाले आहेत. डीएसके व त्यांची पत्नी हेमंती या दोघांच्या हातात गुन्ह्याची पाटी आहे व त्यावर कलमं लिहिली आहेत. दीपक सखाराम कुलकर्णी असं नाव पाटीवर आहे. त्यांच्या पत्नीचाही फोटो असाच आहे. पाटीवर हेमंती कुलकर्णी असून पाटीवर गुन्ह्यांची नोंद आहे.
ड्रीम सिटी हा डीएसकेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता पण तो पूर्ण होण्याच्या आधीच डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. डीसकेंना अनेकांनी पाठिंबा दिला तर काहींनी कडाडून विरोध केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डीएसकेंना पाठिंबा दिला होता पण इतकं होऊनही फेब्रुवारी महिन्यात त्यांना अटक झाली. सध्या डीएसके व त्यांची पत्नी हेमंती पुण्यातील येरवडा तुरूंगात आहेत. बांधकाम उद्योगाला मंदी आल्याने गुंतवणूकदार अडचणीत सापडले. मध्यमवर्गीयांना घरं मिळवून देणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून डीएसकेंची ओळख होती. मात्र ड्रीम सिटी प्रोजेक्टनंतर त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या.