सर्व रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन ऑडिट करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:06 AM2021-04-24T05:06:41+5:302021-04-24T05:06:54+5:30
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करतानाच ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलीस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टँकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडेसिविरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे सोमवार साधला.
राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का, तो वाया जाऊ नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे, याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणूक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाही ना, तो वाया जात नाही ना, याची पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
कालबद्ध कार्यक्रम आखून फायर ऑडिट करा - फडणवीस
नागपूर : भंडारा, नागपूर, नाशिक, मुंबई आणि आता विरार या घटना अतिशय गंभीर आहेत. अशा घटनांच्या मुळाशी जात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आता पुढच्या काळात कालबद्ध कार्यक्रम आखून फायर ऑडिट करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
विरार येथे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत लोकांचे प्राण जाण्याची घटना
ही अतिशय धक्कादायक आहे. एकीकडे कोविडचे भय आणि
त्यात अशा घटनांनी भय आणखी वाढते आहे. त्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, कोविडची लढाई अशा घटनांनी आणखी कठीण होऊन जाते. संबंधित विभागांनी यासाठी स्वत: पुढाकार घेऊन एका ठरावीक कालावधीत सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.