एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:42 PM2020-01-04T17:42:39+5:302020-01-04T17:59:30+5:30
शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीत अनेक वर्षापासून मित्रपक्ष असलेले शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाला. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने आग्रही भूमिका घेत विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे भाजपा सत्तेपासून दूर राहिली. शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागल्याने भाजपा नेते राज्यात नव्या मित्रपक्षाच्या शोधात असल्याचं दिसून येतं.
याचाच प्रत्यय पालघरमधील वाडा पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकाच बॅनरवर फोटो झळकल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. पालघरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ७ जानेवारी याठिकाणी मतदान होणार आहे. वाडा पंचायत निवडणुकीच्या भाजपा उमेदवाराने बॅनरवर राज ठाकरेंचे फोटो लावल्याने भाजपा-मनसे यांच्यात राज्यात जवळीक वाढणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी शपथ घेतली. राज्यातील सत्तांतराचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. जिल्हा परिषद अध्यक्ष, महानगरपालिका महापौर निवडणुकीत स्थानिक आघाड्या स्थापन झाल्या. मात्र या सर्व घडामोडी नाशिक महानगरपालिकेत मनसेने भाजपाला मदत केली तसेच केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळीही भाजपा उमेदवाराला मनसेची साथ मिळाली.
शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत असलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या २३ जानेवारीला काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. २३ जानेवारी रोजी मुंबईत मनसेचं महाअधिवेशन होणार असून यापुढे मनसेची दिशा काय असेल ते स्पष्ट होईल. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात कडवी भूमिका घेतली होती. पण राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे कट्टर विरोधक एकत्र येत असतील तर राजकारणात काहीही होऊ शकतं याची प्रचिती सर्वांनाच आली आहे.