ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये एकूण 30 शहरांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातल्या केवळ पिंपरी चिंचवडचाच समावेश आहे. केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटींची तिसरी यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
या तिसऱ्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड या महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशभरातील ३० शहरांची तिसरी यादी जाहीर केली. "स्मार्ट सिटी" अंतर्गत आता देशभरातील एकूण ९० शहरांचा कायापालट होणार आहे. स्मार्ट शहरांच्या योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील यादीत ३० शहरांची निवड करण्यात आली आहे. यादीत पिंपरी – चिंचवड १८ व्या स्थानी आहे.
विशेष म्हणजे या यादीत अमरावती शहराचं सुद्धा पहिल्या पाचमध्ये नाव आहे, पण हे अमरावती शहर महाराष्ट्रातील नसून आंध्रप्रदेशातील आहे. या शिवाय तिरुवअनंतपुरम, नवा रायपूर, राजकोट, अमरावती, पाटणा, करीमनगर, मुजफ्फपूर, पुद्दूचेरी, गांधीनगर, श्रीनगर, सागर, कर्नाल, सतना, बेंगळुरु, शिमला, त्रिपूर, पिंपरी-चिंचवड, बिलासपूर, पासिघाट, जम्मू, दाहोद, तिरुनेलवेल्ली, थूठकुडी, तिरूचिरापल्ली, झाशी, आयझॉल, अलाहाबाद, अलीगढ आणि गंगटोक आदी शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
Announcing the next batch of 30 new #SmartCities, selected under 3rd round of #SmartCity Mission, taking total number of Smart cities to 90. pic.twitter.com/PSFhUcFiw0— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) June 23, 2017
शहरांची यादी पुढीलप्रमाणे...
या शहरं स्मार्ट करण्याच्या योजनेमध्ये शहर स्मार्ट करण्यासाठी शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तिथे प्रत्येक कामासाठी स्मार्ट सुविधा असतील. स्मार्ट शहरासाठी शहरातीलच एक विशिष्ट भाग निवडून त्यात या स्मार्ट सुविधा दिल्या जातील.
अशी होते स्मार्ट शहरांची निवड.
स्मार्ट शहराची निवड ही शहर आणि पालिकेचा भाग बघून केली जाते. त्यात क्षेत्रनिहाय विकास केला जातो. साधारण पाचशे एकर जागा निवडून तिचा फेरविकास केला जातो. त्यात पालिकेचा वॉर्डही असू शकतो, नागरिकांचा सहभाग असतो.२५० एकरात हरितक्षेत्र असतं पण त्यात मोकळ्या जागेचा वापर अभिनव पद्धतीने केला जातो. ५० एकर क्षेत्राचा पुनर्विकास केला जातो, त्यात सध्याचा बांधणी केलेला भाग बदलून तिथे नवीन आराखडय़ानुसार त्याची रचना करतात.
पायाभूत सुविधा कोणत्या?
शहरामध्ये पाणी, वीज पुरवठय़ाचा तुटवडा जाणवत नाही. सांडपाणी व्यवस्थापन, मैलापाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलेले असते. तिथे वाहतुकीचे यांत्रिक नियोजन असल्याने वाहतूक कोंडी नसते. माहिती तंत्रज्ञानातील उत्तम सुविधा त्यात दिल्या जातात. वेगवान इंटरनेट तिथे असते. सरकारचा कारभार हा इ- गव्हर्नन्स पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालतो. नागरिकांचा सहभाग, सुरक्षा यांना महत्त्व दिलं जातं.