मुंबई/पुणे : मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १४.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह राज्यातील गारवा कायम असून, २ जानेवारी रोजीही मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील थंडीची लाट कायम राहणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मुंबई आणि आसपाच्या परिसराचा विचार करता २ आणि ३ जानेवारी रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १६ अंश नोंदविण्यात येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.सध्या उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, पूर्व मध्य प्रदेश, आणि तेलंगणा येथे तुरळक ठिकाणी थंडीची लाट आली आहे़ भटिंडा येथे सर्वात कमी तापमान ०़७ अंश से. नोंद झाली आहे़राज्यात थंडीचे दोन बळीसातारा आणि जळगावात थंडीमुळे प्रत्येकी एक असा दोघांचा बळी गेला. सातारा जिल्ह्यातील विवर (ता. जावळी) येथील शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) यांचा गारठ्याने मृत्यू झाला. तर जळगाव शहरानजीक एका फिरस्त्याचा मृत्यू झाला.
नववर्षाच्या उत्साहात गुलाबी थंडीची भर; अहमदनगरमध्ये सर्वाधिक तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 1:39 AM