स्वातंत्र्यवीर सावरकरांना खलनायक ठरवण्याचा नियोजित कट, Sanjay Raut यांचं रोखठोक मत, Rajnath Singh यांनाही सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 08:53 AM2021-10-24T08:53:46+5:302021-10-24T08:59:00+5:30
Swatantryaveer Savarkar: सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली. त्याउलट सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक लढवय्ये निर्माण झाले. सावरकरांना सातत्याने खलनायक ठरवण्याचे प्रयत्न झाले. मात्र प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांसाठी ते नायकच आहेत, अशी रोखठोक भूमिका Sanjay Raut यांनी मांडली आहे.
मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधीच्या सल्ल्यानुसार माफी मागितली होती असे विधान काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. तेव्हापासून राजकीय वर्तुळात सावरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उदगार काढणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली. त्याउलट सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक लढवय्ये निर्माण झाले. सावरकरांना सातत्याने खलनायक ठरवण्याचे प्रयत्न झाले. मात्र प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांसाठी ते नायकच आहेत, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.
या लेखात संजय राऊत लिहितात की, विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. स्वातंत्र्यापूर्वी त्यांना परकीयांनी छळले आणि आज स्वकीय त्यांचा छळ करत आहेत. सावरकरांचे उत्तुंग क्रांतिकार्य, देशासाठी त्यांनी केलेला त्याग विसरून काही लोक सावरकरांना माफी मागून सुटलेला वीर अशी संभावना करत असतात. हा एक कट आहे. गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली, असे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावरून वादळ निर्माण झाले. सावरकरांच्या चारित्र्यहननाचे नवे उद्योग सुरू झाले. सावरकरांनी आपल्या क्रांतिपर्वात माफी मागण्याशिवाय काहीच केले नाही, असे काही लोकांना वाटते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अंगावर एक चटोराही मारून घेतला नाही, असे लोक सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा करतात. मात्र सावरकरांसारख्या क्रांतिकारकांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात क्रांतिकारकांची फौज तयार केली.
सावरकरांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या होत्या. ते काळेपाणीच होते. या शिक्षा पूर्ण भोगल्या असत्या तर ते २३ डिसेंबर १९६० रोजी पन्नास वर्षे झाल्यावर त्यांची सुटका झाली असती. अंदमानच्या अंधाऱ्या गुहेत खितपत पडत मरण्यापेक्षा युक्तीने बाहेर पडावे, मग देशसेवेत मग्न व्हावे, हा विचार सावरकरांनी केला. सावरकरांनी वेळोवेळी केलेले अर्ज, त्यामागचा राजकीय संदर्भ आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते, हे लक्षात येते, असे संजय राऊत यांनी सांगितले.
गांधीजींच्या विरोधात सावरकरांना उभे करून विषाचे प्रवाह निर्माण केले गेले. आज काही लोक महात्मा गांधींना मानायला तयार नाहीत. गांधींच्या तुलनेत सरदार पटेल उंच, महान असल्याचे दाखवून नवे राजकारण करत आहेत. सावरकरांनाही त्याच मार्गावरून जावे लागले. सावरकरांवर चिखलफेक सदैव झाली. यापुढेही सुरूच राहील. मात्र सावरकरांच्या प्रतिष्ठेचा बालही बाका होणार नाही.