शिर्डी : साई समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम साई समाधीचे दर्शन घेतले आणि मंत्रोच्चारांच्या गजरात पाद्यपूजन केले. तसेच, यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या.
नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. गरिबांचे दु:ख दूर करण्यासाठी त्यांना आणखी शक्ती मिळो, अशी प्रार्थना साईबाबांकडे करतो.
नरेंद्र मोदींनी आणलेल्या योजना आम्ही सर्वप्रथन महाराशष्ट्रात पूर्णपणे लागू करण्यास प्रयत्न करु. तसेच, महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे या दुष्काळावर मात करण्यासाठी 2015 मध्ये केंद्र सरकार हिमालयाप्रमाणे आमच्या पाठिशी उभे होते. त्याप्रमाणे यंदाही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठिशी उभे राहील अशी आशा करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर, 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे, पण महाराष्ट्रात ते आम्ही 2019 पर्यंतच पूर्ण करु, असे आश्वासनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.