विषबाधेने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By admin | Published: August 31, 2015 01:51 AM2015-08-31T01:51:46+5:302015-08-31T01:51:46+5:30
घरातील जेवणातून एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा होऊन पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली. पहिल्यांदा या आत्महत्या
मुंबई : घरातील जेवणातून एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा होऊन पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली. पहिल्यांदा या आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांचा मृत्यू विषबाधेतून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कुर्ल्याच्या ख्रिश्चन गाव येथे जोेसेफ मकासरे (५२) हे त्यांची पत्नी स्मिता मकासरे (४८) आणि मायकल मकासरे (२२) यांच्यासोबत राहत होते. महापालिकेत जोसेफ हे कंत्राटदार होते. गुरुवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर तिघांना उलटी आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला घरी बोलावले. डॉक्टराने काही औषधे दिल्यानंतर त्यांना काही वेळ बरे वाटू लागले. मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा सर्वांना चक्कर येत असल्यासारखे वाटू लागल्याने शेजाऱ्यांनी त्यांना विद्याविहार येथील कोहिनूर रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास यातील मायकल आणि त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास जोसेफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विनोबा भावे नगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. तसेच या कुटुंबीयांनी हॉटेलमधील जेवण खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली, अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी गंभीर अवस्थेत असलेल्या स्मिता मकासरे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुरुवारी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. तसेच अन्नातून विषबाधा झाल्यानेच त्यांची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी केवळ घटनेची नोंद करीत तपास सुरू केला आहे. मात्र शनिवारी मध्यरात्री स्मिता मकासरे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण आहे. रविवारी तिघांवर सायन येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी धाडले होते.
या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तिघांचाही मृत्यू विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्नाचे नमुने कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.