पोलीस मदत केंद्र नावापुरतेच!
By admin | Published: May 17, 2016 02:44 AM2016-05-17T02:44:41+5:302016-05-17T02:44:41+5:30
पोलिसांच्या संगनमताने परिसरात राजरोसपणे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे आणि गावातील पोलीस मदत केंद्र नावापुरतेच उरल्याचा आरोप होत आहे.
कामशेत : कान्हे गावात व आजूबाजूच्या परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, पोलिसांच्या संगनमताने परिसरात राजरोसपणे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे आणि गावातील पोलीस मदत केंद्र नावापुरतेच उरल्याचा आरोप होत आहे.
कान्हे व परिसराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला असून, तेवढ्याच प्रमाणात अवैध धंदे फोफावल्याचे दिसत आहे. गावात भरवस्तीत चार ते पाच ठिकाणी विनापरवाना,अवैध दारूविक्री सुरू असून, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गांजाविक्री, जुगार चालवणाऱ्यांचे अड्डे, मटका बिनधास्तपणे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. स्थानिक नागरिक विशेषत: महिला व विद्यार्थी यांना त्याचा त्रास होत आहे.
बंदी असलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला आदींची खुलेआम विक्री होत आहे. पोलीस आणि अन्न व प्रशासन विभागांच्या कारवाई न करण्याच्या भूमिकेमुळे गुटखाबंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे.
कान्हे व परिसरात एका वर्षात पाच ते सहा खून, मारामाऱ्या व इतर अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांची सुरक्षितता तसेच कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक वर्षांपूर्वी गावात पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. पण, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यापेक्षा अवैध धंद्यांना अभय देऊन स्वत:चे खिसे भरण्याचे काम संबंधितांकडून सुरू असल्याचा आरोप होत आहे. मदत केंद्रात आलेल्या तक्रारदारांना वाईट वागणूक दिली जात असून, तक्रारीची नोंद केली जात नाही. नोंदवही नसल्याचे कारण सांगून तक्रारदाराला परस्पर वडगाव पोलीस ठाण्यात पिटाळले जाते. हे मदत केंद्र नावापुरतेच उरले आहे, असे नागरिक सांगतात.
महामार्गावर अनेक हॉटेल व ढाबे आहेत, जे रात्री दोन दोन वाजेपर्यंत चालू असतात. येथे बिनबोभाट दारू व नशेच्या पदार्थांची विक्री होते. ‘ड्राय डे’लाही येथे हमखास दारू उपलब्ध होते. अनेक ढाब्यांवर अवैध व्यवसाय चालत असून, पेट्रोल टॅँकरमधून पेट्रोल चोरी, डांबर, आॅइल, तेल आदींचा धंदा तेजीत असल्याचे काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अवैध धंद्यांविषयी कोणी काही बोललेच, तर त्याला विविध मार्गांनी गप्प केले जाते. पोलीस मदत केंद्र नागरिकांसाठी कधी सक्षमपणे कार्यरत होणार? अवैध धंद्यांना आळा कधी बसणार? अशी नागरिकांकडून विचारणा होत आहे. (वार्ताहर)