वाशिम: गत काही दिवसांपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामने सुरू आहेत. या क्रिकेट सट्टय़ावर अकोला व वाशिम पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा घालून २0 सट्टेबाजांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २0 लाख रुपयांचा माल जप्त केला असून, रात्री उशिरापर्यंत सट्टाबाजांवर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. सट्टय़ामध्ये वाशिम जिल्ह्यासह अकोला शहरातील ६ ते ७ जणांचा समावेश असल्याची माहिती अकोल्याचे परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी दिली. वाशिम शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या शेलू बाजार रोडवर क्रिकेटवर सट्टा सुरू असल्याची माहिती अकोला पोलिसांच्या पथकाला मिळाली. यावर तात्काळ कारवाई करीत पोलिसांनी रंगलेल्या क्रिकेट सट्टय़ावर छापा घातला. अचानक पडलेल्या छाप्यामुळे सट्टेबाजांमध्ये एकच धावपळ उडाली. पोलिसांनी अकोला व वाशिम शहरातील मिळून २0 च्याजवळपास सट्टेबाजांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सट्टेबाजांकडून ४५ हजार रुपये रोख, ९0 च्यावर मोबाइल, लॅपटॉप, टॅब, इनोव्हा कार आदी साहित्य जप्त केले. आकोटमधील सट्टाकिंग नरेश भुतडा व त्याच्या सहकार्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर अकोला पोलिसाद्वारे वाशिममध्ये जाऊन ही दुसरी कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईसंदर्भात परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींची यादीही मोठी आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालणार असून, त्यामुळे आरोपींची नावे कळू शकणार नाहीत, अशी माहिती दिली. अकोल्यातील ७ ते ८ सट्टेबाजांचा समावेशआकोट येथील कारवाईमुळे अकोल्यातील सट्टेबाज चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे अकोला शहराच्या बाहेर जाऊन क्रिकेट सट्टा लावण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. वाशिम शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या शेलू बाजार रोडवरील एका खासगी शाळेच्या इमारतीमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा सुरू असून, त्यामध्ये अकोल्यातील ७ ते ८ सट्टेबाजांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सट्टय़ावर छापा घालून, सट्टेबाजांना ताब्यात घेतले. या सट्टेबाजांकडून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
शेलू बाजार रस्त्यावर रंगलेल्या क्रिकेट सट्टय़ावर पोलिसांचा छापा!
By admin | Published: May 02, 2016 1:50 AM