गेल्या विधानसभेच्या कामाचा पोलिसांना मिळणार मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 10:44 PM2020-03-03T22:44:55+5:302020-03-03T22:45:03+5:30
सहा वर्षानंतर गृह विभागाला उपरती
मुंबई : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीला चार महिन्याला अवधी होवून गेल्यानंतर २०१४ मधील विधानसभा निवडणूकीत पोलिसांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्यास गृह विभागाला सवड झाली आहे.निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून ते निकालानंतरची प्रक्रिया पुर्ण होईपर्यत कार्यरत पोलीस अधिकारी,अंमलदारांना परिश्रमिक, मानधन या आर्थिक वर्षातील तरतुदीतून देण्यासाठी गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.
राज्यात कॉँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात असताना १५ आॅक्टोंबर २०१४ रोजी विधानसभा निवडणूक झाली होती. त्यासाठी जवळपास ४५ दिवस आधी निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली होती.तेव्हापासून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्र निवडणूक कार्यालय बनविण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार याठिकाणी अन्य विभागाप्रमाणेच स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांचीही तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.
अन्य विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही त्यांच्या एकुण मूळ वेतना इतका अतिरिक्त मानधन निवडणूकीच्या कामाच्या बदल्यात दिला जातो. मात्र गेल्या जवळपास साडेपाच वर्षापासून ही रक्कम मंजुर करण्यात आलेली नव्हती. त्याबाबत पोलिसांकडून वारंवार विचारणा होवूनही गृह विभागाच्या लालफितीमध्ये त्याबाबतच्या प्रस्तावाची फाईल रखडली होती. दरम्यानच्या काळात राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा ५ वर्षाचा कालावधी पुर्ण होवून गेला, त्यानंतर निवडणूका होवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी अस्त्विात आली. त्यामुळे २०१४ च्या निवडणूकीच्या थकीत कामाचे आतातरी मानधन मिळण्याची अपेक्षा संबंधित पोलिसांकडून करण्यात येत होती. गृह विभागाने या प्रलंबित प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देताना या आर्थिक वर्षातील तरतुदीतून ही रक्कम वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.