मुंबई : राजकारण आणि पत्रकारितेसारख्या क्षेत्रात रोज अनेक लोक भेटतात.अनेक प्रसंग अनुभवायला येतात. याला सरावलेले मन आपसूकच कोडगे बनायला लागते. परंतु समाजात मोठ्या प्रमाणावर असलेले दु:ख समजून घ्यायचे असेल, त्याचे निराकरण करायचे असेल तर प्रयत्नपूर्वक मनाची संवेदनशीलता जपायला हवी, अशी भावना राजकारणातील दिग्गजांनी व्यक्त केली. त्याला निमित्त होते लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी लिखित ‘बिन चेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘बिन चेह-याची माणसं’ या पुस्तकासह त्याच्या आॅडीओ आणि ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आरोग्यमंत्री दिपक सावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, बुकगंगा डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, सुलेखनकार अच्युत पालव आदी उपस्थित होते.अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिन चेह-याची माणसं ’ या पुस्तकातून समाजाच्या संवेदना प्रकट होतात. पुस्तकातील शब्द, घटना, चित्रे आणि अक्षरेही बोलतात, असे हे अनोखे पुस्तक आहे. लेखन, चित्रकला आणि सुलेखन कला यांचा सुरेख संगम या पुस्तकात झाला आहे. शिवाय या पुस्तकाची ई-आवृत्ती आणि आॅडीओ बुकचेही प्रकाशन झाले आहे. हा मराठी साहित्यातील एक वेगळा प्रयोग असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
सामान्यांची स्पंदने आणि संवेदना या पुस्तकात प्रतिबिंबित झाली आहेत. फार कमी शब्दात मोठा आशय, संवेदना आणि भावना पुस्तकातून व्यक्त झाल्या आहेत. पुस्तकातील प्रत्येक कथेवर एक स्वतंत्र पुस्तक लिहीता येईल इतके महत्वाचे विषय पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी पुस्तकातून मांडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर, संवेदनशीलता ही प्रत्येक क्षेत्रातील सर्वात मोठी आवश्यकता असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. संवेदनशीलता बोथट होते तेंव्हा माणसाचे माणूसपण हरवत जाते. प्रत्येक चांगल्या माणसाच्या ठायी एक संवेदनशील मन असणे आणि ते जपणे ही सर्वात मोठी शक्ती असते. परिस्थिती चांगल्या माणसालाही अडचणीत टाकते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या खचलेली माणसे आपले सत्व हरवतात आणि त्यांच्या हातून काही चुका घडतात. सुदैवाने मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेत असजूनही संवेदनशीलता टिकून आहे. अतुल कुलकर्णी त्यांच्या पुस्तकातून त्याचीच प्रचिती दिली आहे. या पुस्तकात एका संवेदनशील पत्रकाराचे मन पहायला मिळते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
पत्रकारांनी कादंबरी लिहीण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. अशा कादंब-यांवर सिनेमेही आले. मात्र, या लिखाण्याचे स्वरुप प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचे होते. अतुल कुलकर्णी यांनी मात्र सामान्य माणसाला केंद्रबिंदू बनविले. त्याच्या संवेदना टीपल्या त्याची मालिका बनविली, असे गौरवोद्गार पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. तर, पत्रकार आणि पत्रकारिता मुक्त असेल तर समाज स्वस्थ आणि स्वतंत्र राहील, असे लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी सांगितले. या स्वातंत्र्यातूनच संवेदनशील मनाची घडण होते. अतुल कुलकुर्णींच्या पुस्तकातील संवेदनशील कथा समाजात बदलाची प्रक्रीयेला गती देतील, असा विश्वासही दर्डा यांनी व्यक्त केला.
‘बिन चेह-याची माणसं’ या पुस्तकातून कथा, चित्र आणि सुलेखनाचा प्रभावी संगम पाहायला मिळते. अशा त्रिवेणी संगमातून दर्जेदार साहित्य निर्मितीचा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला प्रयोग असल्याचे गौरवोद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढले. समाजाचे प्रश्न, समाजातील वेदना मांडण्याची संवेदनशीलता ‘लोकमत’ने जपली आहे. लोकमत समूहाचा हाच संस्कार लेखक अतुल कुलकर्णी यांच्यावर झाले आहेत. त्यामुळेच समाजातील सामन्य माणसाच्या संवेदना त्यांच्या लेखणीने टीपल्याचे राजेंद्र दर्डा म्हणाले. यावेळी अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रकार प्रकाश बाळ जोशी, सुलेखनकार अच्युत पालव आणि मंदार जोगळेकर, यांचीही भाषणे झाली.