मुंबई - सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची अत्याधुनिक सुखोई विमानातून घेण्यात आलेल्या चाचणी यशस्वी ठरल्याबद्दल संशोधकांचे कौतुक करतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपालाही टोले लगावले आहेत. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. पण राजकारण्यांचे म्हणाल तर आवाजाच्या वेगापेक्षा दहापट वेगाने ते थापा मारीत असतात. ‘ब्राह्मोस’ आम्हीच बनवून सुखोईत ढकलले असे उद्या गुजरातच्या सभेत कुणी जाहीर केले नाही म्हणजे मिळवले! असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
‘ब्राह्मोस’ हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र सुखोईतून डागण्यात आल्यानंतर बऱ्याच जणांनी पंतप्रधानांचे अभिनंदन व कौतुक केले आहे, पण ‘ब्राह्मोस’ बनविण्याची व डागण्याची प्रक्रिया ही मोदी सरकार येण्याआधीपासून सुरू आहे असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. संरक्षण, उत्पादन व त्यासंदर्भातील संशोधनकार्य हे सुरूच असते. तेच खरे राष्ट्रकार्य असते आणि या कार्यात लाखो जवान व संशोधकांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे ब्राह्मोस सुपरसॉनिकबाबत आपल्या शास्त्रज्ञांना वाकून नमस्कार करावाच लागेल असे उद्धव यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- पाकिस्तानमुळे हिंदुस्थानच्या सीमा कायम अशांत आहेत व तिकडे चीनही धडका देत असतो. त्या सगळयासाठी ‘सुपरसॉनिक ब्राह्मोस’ची यशस्वी चाचणी ही धोक्याची घंटा आहे. ‘ब्राह्मोस’ हे जगातील सर्वाधिक वजनदार क्षेपणास्त्रांपैकी एक असून आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. हे आमच्या संरक्षण क्षेत्रातील संशोधकांचे यश. राजकारण्यांचे म्हणाल तर आवाजाच्या वेगापेक्षा दहापट वेगाने ते थापा मारीत असतात. ‘ब्राह्मोस’ आम्हीच बनवून सुखोईत ढकलले असे उद्या गुजरातच्या सभेत कुणी जाहीर केले नाही म्हणजे मिळवले!
- हिंदुस्थान कोणत्याही आक्रमणाशी सामना करण्यास सज्ज आहे. सुखोईतून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची चाचणी गुरुवारी यशस्वीरीत्या पार पडली आहे. सुखोई ३०-एमकेआय या विमानातून डागल्यानंतर थोड्याच वेळात ‘ब्राह्मोस’ क्षेपणाक्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरातील पूर्वनियोजित लक्ष्याचा अचूक भेद केला. हिंदुस्थानी संशोधकांचे हे सगळ्यात मोठे यश आहे. ‘ब्राह्मोस’ हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र सुखोईतून डागण्यात आल्यानंतर बऱ्याच जणांनी पंतप्रधानांचे अभिनंदन व कौतुक केले आहे, पण ‘ब्राह्मोस’ बनविण्याची व डागण्याची प्रक्रिया ही मोदी सरकार येण्याआधीपासून सुरू आहे. हिंदुस्थान आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्पातून ‘ब्राह्मोस’ विकसित करण्यात आले आहे. हिंदुस्थानी नदी ब्रह्मपुत्रा आणि रशियन नदी ‘मोस्कवा’ यांच्या आद्याक्षरांनी ‘ब्राह्मोस’ हे नाव या क्षेपणास्त्राला देण्यात आले आहे. सुखोईवर हे क्षेपणास्त्र बसविण्याचे काम संपूर्णपणे हिंदुस्थानी एअरोनॉटिक्स कंपनीच्या अभियंत्यांनी केले. हिंदुस्थानी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), एचएएल आणि हवाई दल यांनी एकत्रितपणे हे काम केले.
- राज्यकर्ते बदलले तरी संरक्षण, उत्पादन व त्यासंदर्भातील संशोधनकार्य हे सुरूच असते. तेच खरे राष्ट्रकार्य असते आणि या कार्यात लाखो जवान व संशोधकांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे ब्राह्मोस सुपरसॉनिकबाबत आपल्या शास्त्रज्ञांना वाकून नमस्कार करावाच लागेल. हिंदुस्थानातील जनता सध्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादात गुंग झाली आहे व गुजरात निवडणुकीत नक्की काय होणार या सट्टेबाजीतही तिला नको तितका रस आहे, पण या सगळय़ांचा विचार न करता आमचे जवान व शास्त्रज्ञ काम करीत असतात. हे सर्व लोक राष्ट्रीय सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावीत आहेत म्हणून राष्ट्र खंबीरपणे उभे आहे. आजही संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत आपण इतरांच्या तुलनेत मागे आहोत. लढाऊ तोफा असोत, सैनिकी ताफ्यातील हेलिकॉप्टर असोत नाहीतर लढाऊ विमाने असोत, हजारो कोटी रुपयांची सौदेबाजी आपण परराष्ट्रांशी करीत असतो. मग ती रशियाची सुखोई विमाने असतील किंवा राफेल विमानांसाठी फ्रान्सशी केलेला करार असेल. अर्थात, विमान सुखोई असले तरी ‘ब्राह्मोस’ हिंदुस्थानी बनावटीचे आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी यासंदर्भात उत्तम माहिती समोर आणली आहे. ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांच्यानुसार सुखोईतून ब्राह्मोसची झालेली चाचणी शत्रुराष्ट्राच्या छातीत धडकी भरवणारीच आहे.
- हवाई दलातील सुखोई हे अत्याधुनिक लढाऊ विमान असून त्याचा पल्ला ३२०० किमीहून अधिक आहे. ब्राह्मोसची चाचणी यशस्वी झाली. यापूर्वी जमीन व पाण्यातून त्याचे प्रक्षेपण झाले आणि आता हवेतून मारा झाला. त्यामुळे पाकसारख्या दहशतवादी राष्ट्रांवर आपल्या जमिनीवरून अणुबॉम्ब टाकणेही सहजसोपे होईल. पूर्वी दुष्मनांच्या भूभागात जाऊन हल्ला करावा लागायचा. त्यात आपलेही मोठे नुकसान होत असे, पण ब्राह्मोस प्रक्षेपणामुळे आपल्या हद्दीतच राहून शत्रूवर हल्ला करता येईल. पाकिस्तानमुळे हिंदुस्थानच्या सीमा कायम अशांत आहेत व तिकडे चीनही धडका देत असतो. त्या सगळ्यासाठी ‘सुपरसॉनिक ब्राह्मोस’ची यशस्वी चाचणी ही धोक्याची घंटा आहे. ‘ब्राह्मोस’ हे जगातील सर्वाधिक वजनदार क्षेपणास्त्रापैकी एक असून आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. हे आमच्या संरक्षण क्षेत्रातील संशोधकांचे यश. राजकारण्यांचे म्हणाल तर आवाजाच्या वेगापेक्षा दहापट वेगाने ते थापा मारीत असतात. ‘ब्राह्मोस’ आम्हीच बनवून सुखोईत ढकलले असे उद्या गुजरातच्या सभेत कुणी जाहीर केले नाही म्हणजे मिळवले!