‘फ्लॉप’ शोचेही राजकारण
By admin | Published: September 10, 2016 01:41 AM2016-09-10T01:41:12+5:302016-09-10T01:41:12+5:30
मुंबईतल्या नागरी समस्यांचे नेहमीच राजकारण करणाऱ्या महापालिकेच्या राजकारण्यांनी कपिल शर्माच्या तक्रारीचेही राजकारण केले.
मुंबई : मुंबईतल्या नागरी समस्यांचे नेहमीच राजकारण करणाऱ्या महापालिकेच्या राजकारण्यांनी कपिल शर्माच्या तक्रारीचेही राजकारण केले. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या प्रकरणात आपआपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांच्या तक्रारीवर मौन बाळगणारी महापालिका एखाद्या सेलीब्रिटीच्या तालावर कशी नाचते? याचे दाखले देत आपआपल्या पक्षाची राजकीय ताकद पणाला लावण्याचे प्रकारही यानिमित्ताने समोर आले.
विनोदवीर कपिल शर्माने मुंबई महापालिकेत लाच मागितल्याबाबत टिष्ट्वट केल्यानंतर शिवसेनेने कपिलवर निशाणा साधला. कपिलच्या आरोपांमध्ये कॉमेडी आहे का ते बघावे लागेल, असे म्हणत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांनी त्याच्यावर टीका केली. पडद्यावरची कॉमेडी जर प्रत्यक्षात आणली आणि विनाकारण शिवसेनेचे नाव घेतले, तर शिवसेना त्याचे कॉमेडी स्टाईलने उत्तर देईल, असा सज्जड दमच पेडणेकरांनी दिला आहे. कपिल शर्माचा बोलविता धनी कुणीतरी दुसराच आहे. हा बोलविता धनी कोण आहे, हेसुद्धा शोधले पाहिजे. कोणाचे नाव माहीत नाही, पैसे कोणाला द्यायचे, हेही माहीत नाही. तर मग कोणी शर्मा-वर्माने उठावे आणि महापालिकेचे नाव घ्यावे हे सहन करणार नाही. मुंबईचे बॉम्बे किंवा बम्बई नाव करण्याचा विचार करणारेच या सगळ्याच्या पाठीमागे आहेत काय हे पाहावे लागेल, असे म्हणत पेडणेकर यांनी नव्या राजकीय वादाला तोंड फोडले.
शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वास राव यांनीही कपिलवर तोफ डागली. कपिलने केलेले बांधकाम अनधिकृत आहे. महापालिकेने त्याला बांधकाम थांबविण्याची नोटीस दिल्यावरही बांधकाम सुरूच ठेवल्याचे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
>‘कपिलचे शूटिंग बंद पाडणार’
कपिल शर्माने पालिकेवर केलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले आहे. कपिलने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते लाचखोरी प्रकरणात मध्यस्थी करीत असल्याचा आरोप केला. यावर महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कपिलला आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. अन्यथा मुंबईत त्याचे शूटिंग कुठेही चालत असल्यास ते बंद पाडू, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेने कपिल शर्माकडून पाच लाख रुपये लाच मागितली आणि तो स्वत: याबद्दल बोलला, हे महत्त्वाचे आहे. २० वर्षांपासून शिवसेना-भाजपाची महानगरपालिकेत सत्ता आहे. पालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. महापालिकेत भ्रष्टाचार, लाचखोरी आणि घोटाळे सुरू आहेत. सत्ताधारी मात्र या सगळ्याला संरक्षण देत आहेत. याची चौकशी होत नाही. ठेकेदार आणि अभियंत्यांवर ठपका ठेवला जात आहे. घोटाळ्यात व भ्रष्टाचारात सत्ताधारी गुंतले आहेत. महापालिका खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, नालेसफाई, मुबलक पाणी या सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. - संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
>अधिकृत तक्रार का नाही?
कपिल शर्माने अधिकृतरीत्या कोणतीही तक्रार केलेली नाही. तरीदेखील कपिल शर्मा याने लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाचा खुलासा करावा. त्यामुळे आम्हाला योग्य ती कारवाई करता येईल.
- मनोहर पवार, मुख्य अभियंते, दक्षता विभाग, महापालिका
>सामान्यांचे प्रश्नही मार्गी लागावेत
सरकार काही निवडक सेलीब्रिटींना न्याय देते. तोच न्याय राज्यातील सर्व नागरिकांना मिळाला पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेस राज्यभर ‘टिष्ट्वट आंदोलन’ करेल. महापालिकेत भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे हे सरकारने मान्य केले आहे. सत्तेत भागीदार म्हणून भाजपा या भ्रष्टाचारात सामील आहे. अनेक प्रश्नांवर जनतेला न्याय मिळत नसून राज्यात आंदोलनांचे प्रमाणही वाढले आहे. जनतेच्या रिअॅलिटी शोमधील प्रश्न सोडविण्यात सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे.
- सचिन सावंत, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
>सत्ताबदल हाच पर्याय
जे टिष्ट्वट करू शकत नाहीत, अशा सामान्यांची तत्परतेने दखल मुख्यमंत्री आणि राज्य सरकार घेणार का? महापालिकेतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी सत्ताबदल हाच पर्याय आता शिल्लक आहे.
- सचिन अहिर, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
विनोदवीर कपिल शर्माने मुंबई महापालिकेत लाच मागितल्याबाबत टिष्ट्वट केल्यानंतर शिवसेनेने कपिलवर निशाणा साधला. कपिलच्या आरोपांमध्ये कॉमेडी आहे का ते बघावे लागेल, असे म्हणत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांनी त्याच्यावर टीका केली. पडद्यावरची कॉमेडी जर प्रत्यक्षात आणली आणि विनाकारण शिवसेनेचे नाव घेतले, तर शिवसेना त्याचे कॉमेडी स्टाईलने उत्तर देईल, असा सज्जड दमच पेडणेकरांनी दिला आहे. भाजपानेही या प्रकरणी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपानेही लाचखोरांवर कारवाईची मागणी करीत आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
>मनसेने लाच मागितल्याचे पुरावे कपिलने सादर करावेत; तसेच लाच घेतली असल्यास किंवा मागितली असल्यास भ्रष्ट अधिकाऱ्यावरही कारवाई करावी.
- संदीप देशपांडे,
गटनेते, मनसे