नांदेड : गुजरात-मुंबई या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामात राज्य शासनाने खोडा घातला आहे. त्यामुळे या ट्रेनचे काम गुजरातमध्ये वेगाने होत असताना राज्यात मात्र ते बंद पडले आहे. यामागे छोटे राजकारण आहे. अशोकराव, तुम्ही मजबूत नेते आहात. तुम्हीच मुख्यमंत्र्यांना समजावून सांगा, की विकासकामात राजकारण करू नका, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिला. तसेच नागपूर-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देखील फडणवीस यांनी दिले. नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे दिवंगत गंगाधरराव कुंटूरकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी फडणवीस आणि चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री रविवारी एकाच व्यासपीठावर होते. यावेळी फडणवीस म्हणाले, गुजरात-मुंबई बुलेट ट्रेनसाठी जपानने पैसे दिले आहेत, ते अत्यंत कमी टक्के व्याजाने. मुंबई-नागपूर आणि पुढे नागपूर-हैदराबाद बुलेट ट्रेनसाठीही जपानने पैसे दिले असते. परंतु छोटे राजकारण करून राज्यात बुलेट ट्रेनचे काम बंद पाडले.
नांदेड ते हैदराबाद या बुलेट ट्रेनची आमची मागणी आहे. रेल्वे राज्यमंत्री दानवेंना तुम्ही सांगा, पंतप्रधानांकडे त्यासाठी पाठपुरावा करा म्हणून. मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी रोजगार निर्मितीवर आमचा भर आहे.- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री