सारांश: आयुष्य म्हणजे... मज्जाच मज्जा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:57 AM2022-05-15T11:57:20+5:302022-05-15T11:58:28+5:30
मित्र, नातेवाईक यांना जोडून राहायला हवे. त्यांच्यामुळे आयुष्यात खरे जगता येते. सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र आहे.
चंद्रकांत दडस, उपसंपादक, लोकमत, मुंबई
ध्या प्रत्येकाच्या आयुष्यात, कुटुंबात सतत ताणतणाव दिसतो. अनेकांचे आयुष्य सुन्न झाल्यासारखे असते. आयुष्यात सतत घटना घडत असतात, विचित्र परिस्थिती निर्माण होते, आर्थिक अडचणी निर्माण होतात. या सर्व गोष्टींकडे आपण कोणत्या दृष्टिकोणातून पाहतो, हे महत्त्वाचे आहे. बाहेर कितीही कठीण परिस्थिती असली तरीही घडणाऱ्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे, यावरून तुम्हाला समोरची परिस्थिती, माणसे दिसतात. आपण आपला दृष्टिकोन चांगला ठेवला तर कोणतेही, कितीही मोठे संकट आले तरी तुम्ही त्यावर सहज मात करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबाची सोबत कधीही सोडू नका...
जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे, कुटुंबाकडे, भूतकाळाकडे, नातेवाइकांकडे, समाजाकडे, जगाकडे, समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता, हे खूप महत्त्वाचे आहे. आयुष्य सुंदर आहे, मज्जाज मजा असे समजून सतत वाटचाल करत राहिले पाहिजे. आयुष्यात अडचणी आल्या की आपण भावनिक, नाउमेद होतो. रडत बसतो. मात्र त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जातात. केवळ विचार करत बसण्यापेक्षा सतत कृती केल्यास कोणत्याही अडचणीवर मात करता येते. सुखी जीवनासाठी आणखी एक मंत्र म्हणजे आपण मनातल्या मनात खूप गोष्टी दाबून ठेवतो. आपण बोलत नाही. मात्र तसे न करता व्यक्त व्हा. मनातील गोष्टी कुणापुढे तरी मोकळ्या करा.
सध्या नात्यांमध्ये प्रचंड नाहक अपेक्षा वाढल्या आहेत; मात्र या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर उदासीनता येते. वाद वाढतो. यात स्वत: मात्र कृती केली जात नाही. केवळ दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात. विचार जास्त आणि कृती कमी असेल तर अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याबरोबर कधीही तुलना करू नका. जे आहे ते आणि नाही ते स्वीकारा. आपल्यामध्ये अलीकडे मालकीची भावना वाढीस लागली आहे. जे काही आजुबाजूला आहे ते माझे असले पाहिजे, ही अपेक्षा वाढीस लागली आहे. मात्र यामुळे हातात खूप काही लागत नाही. मालकीऐवजी विश्वस्ताची भावना ठेवली तर भरपूर काही आयुष्यात येत राहते. मी, पत्नी आणि मूल ही भावना अलीकडे मोठ्या प्रमाणात रुजली जात आहे; मात्र यामुळे भीती आणि असुरक्षितता वाढीस लागली आहे.
एकत्र कुटुंबाचे फायदे...
- कुटुंब एकत्र असेल तर रोज एक सण असतो.
- प्रत्येकाच्या सुख, दु:खाच्या गोष्टीची चर्चा होते.
- जबाबदारीची भावना वाढते.
- आपल्या वस्तू इतरांना देण्याची भावना वाढते.
- गरजेच्या वेळी आर्थिक मदत होते.
- घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा होतो.
- मानसिक स्थिती उत्तम राहते.
- लहान मुले एकटी पडत नाहीत.
- मुलांवर चांगले संस्कार होतात.
- एकत्र कुटुंबात पुस्तकांवर चर्चा होते.
- सामाजिक सुरक्षा मिळते.
न्युक्लीअर कुटुंबाचे तोटे...
- अडचणीच्या वेळी निर्णय घेता पाठिंबा मिळत नाही.
- भावनात्मक नाते संपते.
- घरात वाद झाल्यास दुसरे कोणी मदतीला येत नाही.
- लहान मुलांमध्ये ऐकटेपणाची भावना वाढीस लागते.
- मानसिक गरजा पूर्ण होत नाहीत.
- लहान मुलांना प्रेम मिळत नाही.