टपाल कर्मचाऱ्यांचा एल्गार; आज देशभर धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 03:11 AM2018-12-14T03:11:57+5:302018-12-14T06:19:55+5:30
देशात २५ हजार टपाल कर्मचाऱ्यांच्या जागा नव्याने निर्माण करण्यासह टपाल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन छेडले आहे.
भोसरी : देशात २५ हजार टपाल कर्मचाऱ्यांच्या जागा नव्याने निर्माण करण्यासह टपाल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत देशभरातील विभागीय कार्यालयांसमोर आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
टपाल कर्मचारी संघटनांकडून मागील वर्षभरापासून विविध मार्गांनी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप त्याला प्रतिसाद न लाभल्याने देशभरातील टपाल कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील महिन्यात २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत टपाल कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून काम केले होते. त्यानंतर आता शुक्रवारी देशभरातील विभागीय कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण ४७ विभागीय कार्यालये आहेत. त्यात पुण्यातील कार्यालयांचा समावेश आहे.
पोस्टमन व एमटीएस कर्मचाºयांच्या रिक्त जागा भरा व रिक्त होणाºया जागा त्याच वर्षामध्ये नियमित भरा. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून देशात २५ हजार टपाल कर्मचाºयांच्या जागा निर्माण कराव्यात. डायरेक्टरेड, सर्कल, डिव्हिजन स्तरावरील मासिक, चौमाही, आरजेसीएम आदी सभा वेळेवर घ्याव्यात. कर्मचाऱ्यांना पत्रे वितरित करण्यासाठी डोअर टू डोअर टाइम फॅक्टर द्यावा, एमटीएस (मल्टिटास्किंग स्टाफ) व आयपी (इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट) परीक्षेला बसण्यास परवानगी द्यावी. एटीएमसाठी बंदूकधारी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
२ जानेवारी २०१९ रोजी सर्व सर्कल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्लीतील डाकभवन कार्यालयावर देशभरातील टपाल कर्मचारी धडकणार आहेत, अशी माहिती नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईजचे पुणे शहर पूर्व विभागाचे सचिव डी. आर. देवकर यांनी दिली.
आठ वर्षांपासून भरती रखडली
राज्यभरात गेल्या आठ वर्षांत टपाल खात्यातील प्रादेशिक विभागात कर्मचाºयांची भरती झाली नाही. यामुळे प्रत्येक कार्यालयात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कामगार शिल्लक आहेत. अपुºया कर्मचारी संख्येमुळे प्रचंड कामाचा ताण जाणवत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ४० टक्के टपाल कर्मचारी आणि एमटीएस कर्मचाºयांच्या जागा अपुºया आहेत. यामुळे टपाल खाते नागरिकांना योग्य सुविधा पुरवू शकत नाही. थेट, अनुकंपा, जीडीएस, खेळाडू आदीमधून या जागा भरून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी टपाल कर्मचाºयांची मागणी आहे.