मुंबई – पावसाळा आला की खड्ड्यांची मोठी समस्या शहरात निर्माण होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि वाया जाणारा वेळ यामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य माणसासह अनेक बड्या लोकांनाही याचा फटका बसत आहे. त्यात नाशिकमधील युवा मराठी उद्योजकालाही खड्ड्यांमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे तब्बल ६ तास वाया गेल्याने या उद्योजकाची जर्मनीची संधी हुकली आहे.
नाशिकमधील या उद्योजकाचे नाव निखिल पांचाळ असं आहे. मेक इन इंडियाचा नारा बुलंद करण्यासाठी जर्मनीतील इंजिनिअरींग प्रदर्शनाला ते जाणार होते. नाशिकहून मुंबईला येऊन विमानाने ते जर्मनीला जाणार होते. पण नाशिकहून दुपारी २ वाजता निघाल्यानंतरही रात्री ८ पर्यंत त्यांना मुंबईत पोहचता आले नाही. त्यामुळे विमान हुकले. जर्मनीतील या प्रदर्शनासाठी गेल्या वर्षभरापासून ते तयारी करत होते. त्याचसोबत लाखो रुपये या प्रोजेक्टसाठी खर्च केले होते. मात्र खड्ड्यांमुळे जर्मनीतील इंजिनिअरींग प्रदर्शनातील त्यांचा स्टॉल आता रिकामी राहणार आहे.
याबाबत निखिल पांचाळ म्हणाले की, मी दुपारी २ वाजता नाशिकहून निघालो होतो. माझं विमान रात्री १२ वाजता होते. एअरपोर्टवर चेक-इनसाठी २ तास आणि प्रवासासाठी ८ तासाचा वेळ ठेऊनही मला वेळेत एअरपोर्टला पोहचता आले नाही. खड्ड्यांमुळे प्रचंड ट्रॅफिक जाम होती. वाहतूक जागेवरून हलतच नव्हती. त्यामुळे मला विमानतळावर पोहचता आले नाही. जर्मनीतील प्रदर्शनासाठी मला संधी मिळाली होती. पण ती आता हुकली असं त्यांनी खंत व्यक्त केली.
तसेच मेक इंडिया इमेज जी बाहेरच्या देशात प्रदर्शनातून दिसणार होती. परंतु आता स्टॉल रिकामा असल्याने वैयक्तिक माझे नुकसान झालंय. माझ्यासाठी बिकट अवस्था आहे. आपल्यासाठी प्रदर्शनात जागा ठेवली होती. तयारी झाली होती. तिथे तुम्ही वेळेवर पोहचू शकत नाही मग तुम्ही तुमचे उत्पादन कसे वेळेत पोहचणार अशी प्रतिमा समोरच्यांमध्ये तयार होते. वेळेवर जर उत्पादन पोहचले नाही तर आपल्या इथं विमान मिस झाले हे सांगू शकत नाही अशी खदखद त्यांनी मांडली.