यंत्रमाग उद्योगास लवकरच पॅकेज
By Admin | Published: August 3, 2016 03:32 AM2016-08-03T03:32:53+5:302016-08-03T03:32:53+5:30
राज्यातील १२ लाख ५० हजार यंत्रमागांना दिलासा देणारे पॅकेज विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी दिले जाईल
मुंबई : राज्यातील १२ लाख ५० हजार यंत्रमागांना दिलासा देणारे पॅकेज विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी दिले जाईल, असे आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.
सुरेश हाळवणकर यांनी यंत्रमागांच्या समस्यांसंदर्भात लक्षवेधी मांडताना महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधत यंत्रमागांच्या कर्जाचे कृषी कर्जाप्रमाणे पुनर्गठन करण्याची मागणी केली. तसेच, यंत्रमागांना सुतगिरण्यांकडून २५ टक्के सुत हे किफायतशीर दराने पुरवावे, बाजूच्या कर्नाटकप्रमाणे एक रुपया युनिट दराने वीज पुरवावी, चीनच्या कापड आयातीवर निर्बंध घालावेत, आदी मागण्या केल्या. काँग्रेसचे आसिफ शेख यांनीही याच मुद्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले. प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार मंडळाची स्थापना तत्काळ करण्याची मागणी केली.
यावर, मंत्री देशमुख यांनी सांगितले की, सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्यात येतील. त्यात कर्जाचे पुनर्गठन, वीज दर कमी करणे आदींचा समावेश असेल. सुतगिरण्यांना नफा होईल अशा पद्धतीने पण किफायतशीर दराने यंत्रमागांना सुत पुरविणारे धोरण आणले जाईल. यंत्रमाग कामगार मंडळाची स्थापना येत्या दोन महिन्यांत करण्यात येईल. अब्दुल सत्तार, राजेश टोपे, अनिल बाबर आदींनी लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)