"सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली? घटनेची चौकशी व्हावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 05:01 PM2021-01-21T17:01:31+5:302021-01-21T17:05:55+5:30

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये आग; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

prakash ambedkar demands probe in serum institutes fire incident | "सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली? घटनेची चौकशी व्हावी"

"सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली? घटनेची चौकशी व्हावी"

Next

पुणे: सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरील कोविशील्ड लस तयार करणारा भाग सुरक्षित असून त्या ठिकाणी आग लागली नसल्याची माहिती सीरमनं दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबद्दल भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सीरममध्ये लागलेल्या आगीबद्दल शंका उपस्थित केला. 'सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मला व्हॉट्स ऍप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली. 
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीदेखील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. 'दीडच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीत आग लागल्याची माहिती मिळत आहे. कोरोना लसीचं उत्पादन सुरू असलेल्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी झालेली नाही. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या परिसरात कोरोना लस तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार वाटत आहे', असं टिळक यांनी म्हटलं.

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. मांजरी भागात असलेल्या सीरमच्या इमारतीत बीसीजी विभाग आहे. या भागात बीसीजीची लस तयार करण्याचं काम चालतं. कोरोना लसीचं संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचं चिंतेची बाब नसल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं. आग लागलेल्या भागात चार कर्मचारी अडकले होते. त्यापैकी तिघांची सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती  अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे. आग लागलेल्या भागात धुराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. आग नेमकी कुठे लागली आहे ते समजणं कठीण जात आहे. आग विझवल्यानंतर त्यामागील नेमकं कारण समजू शकेल, असं रणपिसे यांनी सांगितलं. आगीचे धुराचे लोळ खूप लांबवरुन दिसत असून परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.
 

Read in English

Web Title: prakash ambedkar demands probe in serum institutes fire incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.