नाशिक : खेळण्याचा फुगा किती हानीकारक व जीवघेणा ठरू शकतो याचा प्रत्यय नाशिकमधील एका दुर्दैवी घटनेतून दिसून आला. अनावधानाने आठ महिन्यांच्या बाळाने फुगा गिळल्याने फुगा घशात अडकून श्वासोच्छवास बंद होऊन बाळाचा मृत्यू झाला. नाशिक शहरातील हनुमान चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
नाशिकमधील सिडको परिसरातील विनोद जयस्वाल यांचे कुटुंबीय राहते. त्यांचा आठ महिन्यांचा बाळ वीर हा राहत्या घरात फुग्याने खेळत होता. यावेळी खेळता-खेळता फुगा तोंडात घातला; मात्र श्वासाने फुगा थेट घशात पोहचल्याने बाळाचा श्वास गुदमरायला लागला. सदर बाब वडीलांच्या लक्षात आली व त्यांनी तत्काळ बाळाला घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, दुर्दैवाने बाळाची रस्त्यातच प्राणज्योत मालवली होती. डॉक्टारांनी तत्काळ तपासणी केली; मात्र ह्रदयाचे ठोके बंद पडल्याने बाळास त्यांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वीरचे वडील मूळचे अलहाबाद येथील असून गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते नाशिकमध्ये कामानिमित्त स्थायिक झाले आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.