प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 02:07 PM2022-12-06T14:07:38+5:302022-12-06T14:08:28+5:30
Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाड यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करण्यात आली. यानंतर सर्वच स्तरातून या सर्वांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. टीकेची झोड उठवण्यात आल्यानंतर प्रसाद लाड बॅकफुटवर गेले आहेत. आज पुन्हा एकदा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत. याचबरोबर, माझा कुठलाही दुसरा हेतू नाही, आपण कोकणात वाढलेली पोरं आहोत, याचमुळे हा कोकण महोत्सव आपण आयोजित करत आहोत. सर्वांना एकत्र घेऊन आम्ही कोकणासाठी काम करत आहोत. मागच्या अडीच वर्षात कोकणाला कॅलिफोर्निया करू असे पर्यावरण मंत्री म्हणाले होते. पण ते साधे कोकणात देखील आले नाहीत, असा टोला देखील प्रसाद लाड यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना लागला आहे.
या कोकण महोत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. ते म्हणाले की, काही लोकांना कोकणाचा विकास नको. त्यांना कोकणाला मागास ठेवायचे आहे. जेणेकरून त्यांना भावना भडकावून राजकारण करता येईल. पण आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही कोकणात रिफायनरी करूनच दाखवू, असे ठाम मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच, कोकणाच्या विकासासाठी काजू, सुपारी आणि नारळ उत्पादक आणि पर्यटनाच्या विकासासाठी अधिक चांगल्या योजना सुरु केल्या जातील. हे काम आणखी पुढच्या टप्प्यात नेण्याचे काम राज्य सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
या आधी काय म्हणाले होते प्रसाद लाड?
गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचे विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान त्यांनी केले. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल... पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणाले. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या व्यक्तींनी केला. महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे त्यांनी म्हटले. त्यावर आपलं वाक्य करेक्ट न करताच सारवासारव करताना शिवरायांचे बालपण रायगडावर गेले, असे प्रसाद लाड म्हणाले. छत्रपती शिवरायांनी रायगडावरच स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथूनच त्यांच्या शौर्याची सुरुवात झाली, असेही प्रसाद लाड म्हणाले होते.