नरबळीसाठी बापाने खोदला खड्डा; मुलीने व्हिडीओ शूट करून वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 09:01 AM2022-04-27T09:01:00+5:302022-04-27T09:01:17+5:30
गुप्तधनाचा हव्यास; मांत्रिकासह नऊ गजाआड
बाभूळगाव (जि. यवतमाळ) : गुप्तधनाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याची तयारी खुद्द बापानेच केली होती. यासाठी मध्यरात्री खड्डा खोदून पूजाही मांडण्यात आली. मात्र, तेवढ्यात सुदैवाने घटनास्थळी पोलीस धडकले आणि आरोपी वडील, मांत्रिकासह नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हा धक्कादायक प्रकार बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे सोमवारी मध्यरात्री घडला.
घराच्या मागच्या खोलीत गुप्तधन असल्याची चर्चा हा बाप नेहमीच करायचा. त्याने मांत्रिकाला पाचारण केले. मांत्रिकाने खोलीची पाहणी केली आणि गुप्तधन आहे. मात्र, ते काढण्यासाठी नरबळी द्यावा लागेल, असे बापास सांगितले. मुलीच्या वडिलानेही गुप्तधनाच्या हव्यासाने नरबळी देण्याची तयारी दाखविली आणि त्यानंतर लगेच मागच्या खोलीत खड्डा खोदून पूजा मांडण्यात आली.
ज्या मुलीला नरबळी द्यायचे होते, ती मुलगी मांत्रिक आणि वडिलांचे बोलणे बाजूच्या खोलीतून ऐकत होती. नरबळीचे नाव निघाल्यानंतर आणि त्यात आपलाच बळी द्यायची चर्चा सुरू आहे, हे ऐकल्यानंतर ती गर्भगळीत झाली. तिने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाइलमध्ये खोलीच्या फटीतून वडील आणि मांत्रिकात सुरू असलेल्या चर्चेचा व्हिडीओ शूट केला. खोदलेला खड्डा आणि मांडलेल्या पूजेचे फोटो काढले. हा व्हिडीओ आणि फोटो तिने यवतमाळ येथील आपल्या मित्राला पाठविले. मित्राने या प्रकाराची माहिती तातडीने पोलिसांना दिली.
त्यानंतर बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मांत्रिक आणि प्रमुख आराेपी मुलीच्या वडिलाचे मनसुबे उधळून लावले. यावेळी पूजेचे साहित्य, टोपले, फावडे, फुलांचा हार, आदी साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.
बापासह सर्व नऊ आरोपींना कोठडी
या प्रकरणात राजकुमार जयंत धकाते, विजय शेषराव बावणे, रमेश कवडुजी गुंडेकार, वाल्मीक रमेश वानखडे, विनोद नारायण चुनारकर, दीपक महादेवराव श्रीरामे, आकाश शत्रुघ्न धनकसार या सात आरोपींसह राळेगाव येथील दोन महिलांवर गुन्हे दाखल करून भादंवि कलम ३७६, ३५४, ३०७, ३२३, ५०६, ३४, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण अधिनियम, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपींना मंगळवारी यवतमाळ न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अवघ्या २० मिनिटांत पोहोचले पोलीस
मुलीच्या मित्राने घटनेचे गांभीर्य ओळखून यवतमाळ पोलिसांना माहिती दिली. त्यांनी बाभूळगाव ठाण्याला संदेश दिल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळेच घटनास्थळावरून नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.