राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या ७ डिसेंबर २०२१ रोजी रायगडाला भेट देणार आहेत. यावेळी ते हेलिकॉप्टरने रायगडावर जाणार होते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत रायगड किल्ला आणि रोपवे देखील पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, रायगडावर हेलिकॉप्टर उतरविण्यास शिवप्रेमींनी विरोध केला होता. यामुळे राष्ट्रपतींनी रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला आहे. (President Ramnath Kovind Raigad Visit Controversy)
राष्ट्रपती रायगडावर येत असल्याने त्यांच्या सुरेक्षेसाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जगासह देशाच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
शिवप्रेमींचा विरोध पाहून राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टरने किल्ल्यावर न येता रोपवेने येण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे. ''छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.'', असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करतात, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याला नक्कीच भेट देतात. त्यामुळे पर्यटकांची गौरसोय होवू नये म्हणूनच पोलिसांनी आधीच सूचना दिली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना काही दिवसापूर्वी रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते.