काळेवाडी : लाखो रुपये खर्च करून पादचाऱ्यांसाठी उभारलेल्या फुटपाथवर काळेवाडी-पिंपरी येथील व्यावसायिकांनी थेट बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. काही व्यावसायिकांनी फुटपाथवर बांधकाम करून ते गिळंकृत करूनदेखील महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथ तयार केले आहेत. त्यानुसार काळेवाडी फाटा ते पिंपरी या रस्त्यालगतदेखील दोन्ही बाजंूना पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर पादचाऱ्यांना होत नसून, व्यावसायिकच करीत आहेत. रस्त्यालगतच सिमेंटचे ब्लॉक टाकून तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर तेथील व्यावसायिकांनी दुकानातील विक्रीचे साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. काळेवाडी फाट्याकडून पिंपरीकडे येताना रहाटणी फाट्यासमोरील बहुतांश व्यावसायिकांनी फुटपाथवर विक्रीचे साहित्य ठेवल्यामुळे फुटपाथच दिसेनासा झाला आहे. काळेवाडीत एका व्यावसायिकाने तर ओटाच बांधून त्यावर दुकानातील विक्रीचे अवजड साहित्य ठेवले आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने लाकडे ठेवली आहेत. पिंपरीकडून काळेवाडी फाट्याकडे येताना याहून गंभीर परिस्थिती असून, काळेवाडीतील बहुतांश व्यावसायिकांनी फुटपाथवर विक्रीचे साहित्य ठेवले असून, दुचाकीदेखील पार्क केल्या आहेत. तर काही ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हातगाड्या उभ्या केल्या आहेत. एका व्यावसायिकाने, तर बांधकाम करून बसण्यासाठी ओटादेखील तयार केलेला दिसून आला. या परिसरात दोन शाळा-महाविद्यालये असून, सकाळपासूनच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. काही विद्यार्थी अतिक्रमण नसलेल्या फुटपाथवरून ये-जा करताना दिसतात. मात्र, व्यावसायिकांचे अतिक्रमण नसल्यास विद्यार्थी व पादचारी या फुटपाथचाच वापर करणार असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजंूना असलेल्या फुटपाथवर सर्वच ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मागील आठवड्यातच एका व्यक्तीचा पाण्याच्या टॅँकरच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली. अतिक्रमण विभागाचे वाहन या रस्त्यावर फक्त फिरताना दिसते. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई अधिकारी करीत नाहीत. अधिकारीच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना अभय देत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. (वार्ताहर)
व्यावसायिकांनी केले पदपथ गिळंकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2016 1:52 AM