औरंगाबाद : कायद्यानुसार गतिमंद किंवा अल्पवयीन व्यक्तीस अवयवदान करता येत नाही. त्यामुळे दोन्ही ‘किडन्या’ निकामी झालेल्या २८ वर्षांच्या डॉक्टरची अडचण झाली आहे. इच्छा असूनही गतिमंद भावाची किडनी घेता येत नसल्यामुळे, कुटुंबाने औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली आहे. त्या डॉक्टरच्या अन्य नातेवाइकांची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी मंगळवारी दिले.यवतमाळ येथील डॉ. अतुल पवार या डॉक्टरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यांच्या एका भावाच्या किडन्या डॉ. अतुलशी जुळतात. म्हणून पवार कुटुंब औरंगाबादला बजाज रुग्णालयात गेले. मात्र, डॉ. अतुलचा हा भाऊ गतिमंद असल्यामुळे रुग्णालयातील अवयवदानविषयक समितीने गतिमंद दात्याचे अवयवदान करण्यास ‘ह्युमन आॅर्गन अँड टिश्यूज ट्रान्सप्लान्ट अॅक्ट’ १९९४ च्या कलम ९ (१) नुसार प्रतिबंध असल्याचे कारण दाखवित, त्या दात्याची पुढील वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला.डॉ. अतुल यांचे वडील गणपतराव संभाजीराव पवार यांनी अॅड. पी. के. जोशी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
गतिमंदाची किडनी देण्यास प्रतिबंध, कायद्याचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:58 AM