जलपरीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा प्रस्ताव
By admin | Published: July 27, 2016 08:07 PM2016-07-27T20:07:48+5:302016-07-27T20:07:48+5:30
लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही.
रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे मागणी : आॅगस्ट अखेरपर्यंत सेवा द्या
लातूर : लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत जलपरीची सेवा कायम ठेवावी, असा प्रस्ताव महानगर पालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला आहे.
लातूर शहरात अभुतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने १२ एप्रिलपासून लातूर शहराला रेल्वेव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या अर्धा पावसाळा संपला तरी मांजरा प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. शिवाय, जिल्ह्यातील प्रकल्पही कोरडेठाक आहेत. सध्याही पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची सेवा बंद करण्यात येऊ नये. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही आणि प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जलपरीची सेवा सुरू ठेवावी, असे लातूर महानगर पालिकेने सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. परंतू या पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर अद्याप आले नाही. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा साठा झालेला नाही. मांजरा प्रकल्प क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी, मांजरा प्रकल्प कोरडा आहे. या प्रकल्पात पाणीसाठा झाल्याशिवाय, लातूरकरांना नळाव्दारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे जलपरीची सेवा आवश्यक असल्याचे पत्र रेल्वे पशासनाला पाठविण्यात आले आहे.
मुदतवाढ मिळणार ; रेल्वे प्रशासन सकारात्मक...
रेल्वेकडे मुदत वाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मुदतवाढ मिळेल. जोपर्यंत पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत रेल्वेची सेवा राहणार आहे. तसे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे बोलणे झाले असून, प्रस्तावाला मुदवाढ देण्यासाठी रेल्वे प्रशासन सकारत्मक असल्याचे लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कावळे यांनी सांगितले.