नाशिक : मालेगाव बॉम्बस्फोटातील सरकारी वकील रोहिणी सालीयन यांचे तत्कालीन सहकारी व दहशतवादविरोधी पथकाचे विद्यमान सरकारी वकील अजय मिसर यांच्या हत्त्येचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कट रचला जात असल्याचे पत्र मुंबई मोक्का न्यायालयाचे न्या़ ए़ एल़ पानसरे यांना पाठविण्यात आले होते़ त्यात कटासाठी वापरलेल्या मोबाइल क्रमांकाच्या उल्लेखावरून संबंधित कैद्याची चौकशी करण्यात आली असून, तो बाफना खून प्रकरणातील असल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, या घटनेनंतर अॅड. मिसर यांची सुरक्षा वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी सांगितले़अॅड़ मिसर यांच्या हत्त्येचा कट मध्यवर्ती कारागृहातील मोक्का कैदी बॅरेकमध्ये रचला जात असल्याची तसेच कोणत्या मोबाइलवरून त्याबाबत संभाषण झाले त्याची माहिती मुंबई मोक्का न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे पत्राद्वारे पाठविली होती़ त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया, अॅडिशनल डीजी क्राईम मीरा बोरवणकर तसेच मुख्यमंत्र्याना याबाबत माहिती दिल्यानंतर याबाबत तातडीने सूत्रे हलविण्यात आली़ नाशिकचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी या प्रकरणी जलद तपास केला़ या पत्रातील मोबाइल क्रमांकावरून संबंधिताचा शोध घेतला असता तो ओझर येथील धान्य व्यापाऱ्याचा मुलगा बिपीन बाफणा खुनातील तसेच मोक्काचा आरोपी असल्याचे समोर आले़ अॅड़ मिसर यांच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली असून, २४ तास एक गनमॅन व तीन कॉन्स्टेबल दिले जाणार आहेत़ (प्रतिनिधी)
सरकारी वकील अजय मिसर यांच्या ‘हत्त्येचा कट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2015 2:07 AM