पुणे: प्रयागराज (अहलाबाद) उत्तर प्रदेश गंगा,यमुना व सरस्वती नद्याच्या त्रिवेणी संगमावर ४ मार्चपर्यंत अर्धकुंभ पर्व आयोजित करण्यात आले आहे. तेथील सांस्कृतिक कुंभ या विभागात देशांतील काना कोप-यातून विविध सांस्कृतिक विभागांचे सादरीकरण होत आहे. सांस्कृतिक कुंभमध्ये राष्ट्रीय ललित कला अकादमी नवी दिल्ली यांनी विविध राज्याच्या चित्रकार्य शाळा आयोजित केल्या आहेत. या चित्रकार्यशाळेच्या प्रारंभाचा मान महाराष्ट्राला मिळाला असून, कुंभमेळ्यात महाराष्ट्राच्या चित्रपताका फडकल्या आहेत.दर १२ वर्षांनी पवित्र कुंभ भरतो तर दर ६ वर्षांनी अर्धकुंभ भरते. यंदा प्रयागराज येथे हे अर्धकुंभ भरविण्यात आले असून, सांस्कृतिक कुंभ मध्ये आयोजित चित्रकार्यशाळेत महाराष्ट्रतील तरुण,अनुभवी व्यावसायिक १० चित्रकारांचा सहभाग होता. चित्रकार रामचंद्र खरटमल, विजयकुमार धुमाळ, अजय देशपांडे, विनायक पोतदार, ओंकार पवार, दिग्विजय कुमार, मंदार उजाळ, संजय नोरा, नागेश टोके, रामदास लोभी, या सर्व चित्रकारांनी त्रिवेणी संगमावरील सांस्कृतिक कुंभ येथे चित्रकलेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले. कुंभ मधील वातावरण,सांस्कृतिक महत्व, कुंभ विषयीच्या आख्यायिका, आखाडे साधु- महंत या अनुभूतीवर आधारित प्रत्येकी ३ चित्रकृती चित्रकारांनी तयार केली. त्यांच बरोबर साधु- महंतांना समोर बसवून प्रत्यक्ष रेखाचित्रे सादर केली. या सर्व चित्रांचे प्रदर्शन सांस्कृतिक कुंभ प्रयागराज येथे दि.४ मार्च पर्यंत सर्वांना पाहाण्यासाठी खुले राहणार आहे. ललित कलेच्या अशा उपक्रमामुळे विविध राज्यांच्या कलात्मक संस्कृतीची देवाण-घेवाण होण्याच्या उद्देशाने व्यक्तिचित्रण, चित्र चित्रण कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यशाळेचे मार्गदर्शक संचालक उत्तम पाचरणे (ललित कला अकादमी, नवी दिल्ली) यांनी सांगितले. तर कार्यशाळेचे संयोजन काम प्रा. रमेश भोसले यांनी पाहिले.