पुणे, चंद्रपूरची पाेटनिवडणूक होणार की नाही? लोकसभा निवडणुकीला अनेक महिने, तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:35 AM2023-08-09T06:35:14+5:302023-08-09T06:35:30+5:30
जागा रिक्त झाल्याच्या सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते व आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या सहा महिने आधी पोटनिवडणुका होऊ शकत नाहीत.
- संजय शर्मा
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुणे, चंद्रपूर, अंबाला व गाजीपूर लोकसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार नाही. २०२४च्या निवडणुकांबरोबरच या जागांसाठी लोकसभानिवडणूक होणार आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या पुण्याच्या लोकसभा जागेसाठी अद्याप पोटनिवडणुकीची घोषणा झालेली नाही. आता पुढेही पोटनिवडणूक होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही. चंद्रपूर लोकसभेची जागा काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झाली होती. अंबाला लोकसभेची जागा भाजपचे खासदार रतन लाल कटारिया यांच्या निधनाने रिक्त झाली होती. बसपाचे खासदार अफजल अंसारी यांना कोर्टाने अपात्र ठरविल्यामुळे गाझीपूरची जागा रिक्त झाली होती. या जागांवर लोकसभेच्या पोटनिवडणुका होणार होत्या; परंतु लोकसभा निवडणुकीसाठी ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिल्याचा हवाला देऊन निवडणुका होणार नसल्याचा तर्क दिला जात आहे.
जागा रिक्त झाल्याच्या सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते व आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या सहा महिने आधी पोटनिवडणुका होऊ शकत नाहीत. या नियमांमुळे पुण्यासह चारही लोकसभा जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
या सर्व रिक्त लोकसभा जागांवर २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच लोकसभा निवडणुका होतील. पुण्याच्या जागेसाठी सरकार व निवडणूक आयोगाची इच्छा असती तर निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ शकली असती; परंतु विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल पाहता लोकसभा पोटनिवडणूक घेतलेली नाही, अशी चर्चा आहे.