पुणे : आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणा-या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
याप्रकरणी दक्षिण विभागाच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने दोन महिला एजंटांना अटक केली आहे. उझबेकिस्तान आणि रशिया येथील दोन परदेशी महिला, तसेच मूळच्या दिल्लीच्या राहणा-या सध्या मुंबईमध्ये व्यवसायासाठी आलेल्या 2 मॉडेल यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले.
याबाबत सहायक पोलीस आयुक्त समीर शेख आणि गुंडा स्कॉडचे पोलीस निरीक्षक राम राजेमाने यांनी माहिती दिली़ मुंबई येथून दोन स्त्रिया एजंट मॉडेलिंग करणा-या मुली व परदेशी मुलींना घेऊन वेश्याव्यवसायासाठी पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी बनावट गि-हाईकाच्या माध्यमातून या स्त्रियांबरोबर संपर्क साधला़ त्यांनी रात्री दहा वाजता हॉटेल आॅर्चिडसमोरील चौकामध्ये ओव्हर ब्रीजखाली येत असल्याचे कळविले.
त्याप्रमाणे गुन्हे शाखा व हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर व त्यांच्या पथकाने सापळा रचला़ एका मोटारीतून या दोन स्त्रिया व एक मुलगी आली. त्यापाठोपाठ आणखी एका मोटारीतून तीन मुली आल्या़ बनावट गि-हाईकाने त्यांच्याकडे जाऊन चौकशी करून इशारा करताना पोलीस पथकाने त्यांना पकडले. या दोन्ही महिला एजंट मुंबईतील अंधेरी येथील राहणा-या आहेत.
या महिला एजंट फ्री लान्स इव्हेट मॅनेजमेंटचे काम करतात. त्यादरम्यान नव्याने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणा-या मॉडेल्स, स्ट्रगलिंग करणा-या मॉडेल, तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या मॉडेल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो. या व्यवसायात यातील दलाल हे तारांकित हॉटेललाच प्राधान्य देतात़ त्याशिवाय उच्च दर्जाची दारू, सिगारेट इत्यादीची व्यवस्था मुलीला घेऊन जाणा-या ग्राहकाला करावी लागते. ग्राहकाला त्याच्या नावावर रूम बुक करून त्या हॉटेलचे नाव व रूम नंबर एजंटला कळवावे लागते.
मॉडेलिंग करणा-या या मुली 22 व 25 वर्षांच्या असून परदेशी मुली 26 व 27 वर्षांच्या आहेत़ या परदेशी मुली नोव्हेंबरमध्ये ट्युरिस्ट व्हिसा घेऊन आल्या होत्या़ या दलालांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर रॅकेट असून मलेशिया, नेपाळ, हाँगकाँग या ठिकाणी यापूर्वी या परदेशी मुली जाऊन आल्या आहेत़ मॉडेलिंग करणा-या मुली अनेक व्हिडिओ साँगमध्ये असून त्यांच्यातील एकीने दक्षिणेतील एक चित्रपटही आता साईन केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजेमाने, निरीक्षक अरुण वायकर, सहायक पोलीस निरीक्षक शीतल भालेकर, वैशाली धुमाळ, सहायक उपनिरीक्षक राजाराम सुर्वे, राजेंद्रसिंग चौहान, रवींद्र कदम, शंकर जाभळे, प्रशांत पवार, गणेश साळुंके, प्रवीण तापकीर, रमेश चौधर, प्रवीण पडवळ, कैलास साळुंके, अजय उत्तेकर, विवेक जाधव, किरण ठवरे, राकेश खुणवे, पोलीस नाईक कुंभार, मोरे, चांदगुडे, पागिरे यांनी केली आहे.