मुंबई : पुण्यातील ३० वर्षीय तरुणाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्याच्या पत्नीने हृदयदान करण्याचा निर्णय घेतल्याने, मुंबईच्या ४२ वर्षीय रुग्णाला नवसंजीवनी मिळाली आहे. मुंबईतील ही ८४वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुलुंड येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी यशस्वीपणे पार पडली.पुण्यातील ३० वर्षांचा तरुण हायपर टेन्शनने घरातच कोसळला. त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याची अवस्था बिकट होती. काही वेळातच त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या वेळी अवयवदान समुपदेशन पथक, डॉक्टर यांनी त्याच्या पत्नीची भेट घेऊन, हृदय, तसेच अवयवदानाबाबत सांगितले.त्यास तिने होकार दिला. त्यानुसार, त्याचे हृदय, यकृत, मूत्रपिंड दान करण्यात आले. चेंबूर येथील ४२ वर्षीय रुग्ण हृदयाच्या प्रतीक्षा यादीत होते. त्यासाठी पुण्याहून पहाटे २.१८ वाजता निघालेले हृदय पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी मुलुुंड येथील रुग्णालयात पोहोचले. मृत नातेवाइकाच्या अवयवदान करण्याच्या निर्णयाची सध्या तरी नितांत गरज आहे, असे ज्येष्ठ हृदयशल्य विशारद डॉ.अन्वय मुळे यांनी सांगितले.
पुण्याच्या ३० वर्षीय तरुणाचे हृदयदान! ८४वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:06 AM