- यदु जोशी, मुंबई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम याने मुंबईतील उच्चभ्रू पेडर रोडवर ८० कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कागदोपत्री एवढी रक्कम दिसत असली तरी प्रत्यक्षात या व्यवहारासाठी यापेक्षाही अधिक रक्कम मोजली गेली असल्याची दाट शक्यता आहे. महामंडळात घोटाळ्यांचे इमले रचणाऱ्या कदमने या ठिकाणी आलिशान बंगला बांधण्याचे स्वप्न बाळगले होते. सीआयडीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यापासून कदम फरारी आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, सीआयडीने केलेल्या चौकशीमध्ये पेडर रोडवर कदमने ८०० चौरस मीटरचा प्लॉट खरेदी केल्याची माहिती समोर आली. पेडर रोडसारख्या लब्धप्रतिष्ठितांच्या वस्तीत या प्लॉटची किंमत यापेक्षा कितीतरी जास्त आहे. याचा अर्थ काही रक्कम ‘ब्लॅक’मध्ये दिली असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. या शिवाय कदम याच्या पत्नीच्या नावानेही मुंबईसह काही शहरांमध्ये जमिनी खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. कदम याच्या अनेक घोटाळ्यांमध्ये सामील असलेला त्याचा पीए विजय कसबे याला अटक करण्यात आली आहे. कदमने रोजंदार कर्मचाऱ्यापासून उपमहाव्यवस्थापक म्हणून एकदम बढती दिलेली एक महिला महामंडळाच्या चेंबूरमधील मुख्यालयात नोकरी करते. ती दोन दिवसांपासून गायब असून, तिने मोबाइल बंद ठेवला आहे. कारकून महिलेला अटकमहामंडळाची एक कारकून वैशाली बेंद्रे हिला अटक करण्यात आली आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या थकबाकीपोटी २ कोटी ५० लाख रुपये द्यायचे होते. त्यातील निम्मी रक्कम कदम घेईल आणि निम्मी कर्मचाऱ्यांना दिली जाईल, असा अलिखित करार झाला होता. सूत्रांनी सांगितले की कदमच्या वतीने वैशालीने १ कोटी २५ लाख रुपये घेतले आणि पैसे मिळाल्याच्या पावत्या कर्मचाऱ्यांना दिल्या. वैशालीच्या नावावर मोठी संपत्ती असल्याचे सांगितले जाते. औरंगाबादमध्ये महामंडळाच्या १२ कोटी रुपयांतून दोन एकर जमीन खरेदी करण्यात आली होती. खरेदीसाठीचा इतर खर्च म्हणून ६५ कोटी रुपये देण्यात आले. त्यातील १८ लाख रुपये वाचले. या १८ लाखांचा डीडी घेऊन तारळकर नावाची व्यक्ती औरंगाबादहून मुंबईच्या मुख्यालयात आली आणि तिने हा डीडी नाशिकमधील महामंडळाचा प्लॉट खरेदी केल्याच्या मोबदल्यात जमा केला. या भयंकर घोटाळ्याने तपास यंत्रणा चक्रावून गेली आहे.
८० कोटींच्या भूखंडाची खरेदी
By admin | Published: July 28, 2015 3:00 AM