लुल्लानगर उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर निकाली
By Admin | Published: May 17, 2016 02:59 AM2016-05-17T02:59:50+5:302016-05-17T02:59:50+5:30
लुल्लानगर परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला अखेर मुहूर्त लागला आहे.
पुणे : लुल्लानगर परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला अखेर मुहूर्त लागला आहे. या उड्डाणपुलासाठी संरक्षण खात्याकडून घ्यावे लागणारे सर्व प्रकारचे ना-हरकत दाखले मिळालेले असून येत्या ३१ मे रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुलामुळे या परिसरातील नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत होता.
टिळेकर म्हणाले, की गेल्या जवळपास १५ वर्षांपासून केवळ संरक्षण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याने हा पूल रखडलेला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुलाचे भूमिपूजनही करण्यात आलेले होते. मात्र, संरक्षण मंत्रालयाकडून याचे ना-हरकत प्रमाणपत्र रखडलेले होते. मात्र, त्यानंतर लुल्लानगर उड्डाणपुलासह घोरपडी उड्डाणपुलाची पाहणी करण्याची विनंती केंद्रीयमंत्री पर्रिकर यांना करण्यात आली होती. त्यानुसार, त्यांनी ८ जानेवारी २०१६ रोजी या पुलांच्या जागेची पाहणी करून पुढाकार घेतला होता. त्यानुसार, सर्व मान्यता पूर्ण झाल्या असून या पुलाच्या भूमिपूजनास येण्यास पर्रिकर यांनी संमती दिली. असल्याचे यांनी स्पष्ट केले. यासाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी या वेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, दिलीप कांबळे उपस्थित होते.