राहुल यांनी टोल नाक्यावर विकत घेतल्या शेंगा !
By admin | Published: May 9, 2015 02:36 AM2015-05-09T02:36:17+5:302015-05-09T02:36:17+5:30
भिवंडी-मुंबई रस्त्यावरील खारीगाव टोलनाक्यापाशी पांढऱ्या रंगाची इनोव्हा थांबते... उकडलेल्या खाऱ्या शेंगा विकणाऱ्या मंडळींना या गाडीत कोण आहे, हे काहीच माहीत नसते. सवयीनुसार ते खारा शेंग
विशाल हळदे, ठाणे
भिवंडी-मुंबई रस्त्यावरील खारीगाव टोलनाक्यापाशी पांढऱ्या रंगाची इनोव्हा थांबते... उकडलेल्या खाऱ्या शेंगा विकणाऱ्या मंडळींना या गाडीत कोण आहे, हे काहीच माहीत नसते. सवयीनुसार ते खारा शेंग, बढीया शेंग... असे ओरडत त्या कारपाशी जातात. गाडीच्या खिडकीची काच खाली केली जाते आणि आतून आवाज येतो-
कैसा दिया?
विक्रेता उत्तरतो - दस रुपयां!
गाडीतून १० रुपयांची नोट विक्रेत्याच्या हातावर टेकवली जाते आणि शेंगांचे पॅक घेतले जाते.... ‘अब आयेगा मजा’ म्हणत ते भुईमुगाच्या शेंगांचा आस्वाद घेतात. ज्यांना आपण १० रुपयांच्या शेंगा विकल्या ते कोण आहेत, याची सुतराम कल्पना विक्रेत्यांना नव्हती... पण जेव्हा त्यांना कळले की गाडीत साक्षात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी होते, तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला!
घडले ते असे : भिवंडी कोर्टातील पेशी संपवून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व्हाइट कलरची इनोव्हा सुसाट वेगाने कोणत्याही लवाजम्याविना मुंबईच्या दिशेने निघाली. लाल दिवा नाही की, सुरक्षेचे लटांबर नाही. प्रसारमाध्यमेही त्यांचा बाइट मिळाल्यावर पांगली होती. परंतु, मी मात्र सुसाट वेगाने दुचाकी चालवत त्यांच्या इनोव्हाचा पाठलाग करीत होतो. कारण, या त्यांच्या प्रवासात काहीतरी वेगळे घडेल, काहीतरी न्यूज मिळेल, असे मला वाटत होते आणि घडलेही तसेच. खारीगाव टोलनाक्यापाशी त्यांची इनोव्हा आणि त्यापाठोपाठ माझी दुचाकी थांबली. तिथे उकडलेल्या खाऱ्या शेंगा विकणाऱ्या मंडळींना या गाडीत कोण आहे, हे काहीच माहीत नव्हते. सवयीनुसार ते खारा शेंग, बढीया शेंग... असे ओरडत राहुलजींच्या कारपाशी गेले. ते पाहून राहुल यांना मजा वाटली. त्यांनी आपल्या खिडकीची काच खाली केली आणि एका विक्रेत्याकडून शेंगा विकत घेतल्या.
मी हा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करीत होतो. त्यांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य केले आणि त्यांनी ते शेंगांचे पाकीट माझ्यासमोर केले आणि
‘आप भी लो’, असे म्हणत शेंगांचे पाकीट समोर केले. ‘अब आयेगा मजा...!’ असे म्हणून त्यांनी
शेंगा खाण्यास सुरुवात केली. एवढ्यात, त्यांच्या पुढची गाडी निघाली, तशी त्यांची इनोव्हा सुसाट वेगाने मुंबईच्या दिशेने निघाली व दिसेनाशी झाली. त्या शेंगा विक्रेत्याला आयुष्यातील सगळ्यात व्हीआयपी ग्राहक मिळाला आणि त्यांच्या शेंगांतला वाटेकरी होण्याचे भाग्य मलाही लाभले!