नाणारवरून रायगडमध्येही राजकीय वातावरण गरम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:59 AM2019-06-20T03:59:39+5:302019-06-20T04:00:22+5:30

भू-संपादनास शेकापचा विरोध : शिवसेना जनतेबरोबर

In the Raigad, the political atmosphere is hot | नाणारवरून रायगडमध्येही राजकीय वातावरण गरम

नाणारवरून रायगडमध्येही राजकीय वातावरण गरम

Next

- आविष्कार देसाई 

अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी सरकारने नव्याने भूसंपादन केल्यास त्याला आमचा विरोध राहील, मात्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे तेथे प्रकल्प उभारल्यास आमची हरकत राहणार नाही, असे मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

तर शिवसेना या प्रकल्पाविरोधात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावर रायगडात आगामी काळात आंदोलन पेटून त्याचे चटके मात्र भाजपला बसणार असल्याचे बोलले जाते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर देत ही माहिती दिली. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने तीन लाख कोटी रुपयांचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता, परंतु शिवसेनेने नाणारला प्रखर विरोध केला होता.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली. प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास ४० गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नसल्याचेही ते म्हणाले. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, शेती यासह निसर्गाची प्रचंड हानी होणार असल्यामुळे नाणारवासीयांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध असल्याचे दाखवून दिले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना हा प्रकल्प नको होता तीच परिस्थिती रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. आमचा या प्रकल्पाला विरोध राहील असे शिवसेनेचे महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.

महाडमध्ये प्रकल्प उभारण्याची मागणी
नाणारमधील प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात स्थलांतरित होणार असल्याने शेकापकडून या प्रकल्पाला कडाडून विरोध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. रायगड जिल्ह्यात प्रकल्प आणत असताना नव्याने भूसंपादन करायला आमचा विरोध राहील. कारण या आधीच विविध प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केलेली आहे. महाड तालुक्यातील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. तेथे प्रकल्प उभारावा, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: In the Raigad, the political atmosphere is hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.