पावसाची सुट्टी कॅन्सल; पुढील ४ ते ५ दिवस धो धो कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:28 PM2023-08-02T14:28:42+5:302023-08-02T14:30:11+5:30
पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबई : गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने तडाखा दिल्यानंतर तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यभरात ब्रेक घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बांगलादेशच्या किनाऱ्यावरील बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा पुढील प्रवास खेपुपारच्या पूर्वेला होईल. बांगलादेशची किनारपट्टी ओलांडल्यानंतर त्या पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल ओलांडण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
मुंबईत पावसाने आता बऱ्यापैकी विश्रांती घेतली असली तरी मुंबईसाठीचा ‘यलो अलर्ट’ कायम आहे. या अलर्टनुसार, अधूनमधून येथे तुरळक सरींची शक्यता आहे. मंगळवारी मुंबईत सकाळी ८:३० वाजेपर्यंत अवघ्या दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ७१ टक्के एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
२ ऑगस्ट : ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
३ ऑगस्ट : ऑरेंज अलर्ट : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा