मुंबई / पुणे : मुंबई, कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात बुधवारी विजांच्या कडकडाटात बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. कोकणात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ अचानक आलेल्या या पावसाने मुंबई, पुणे महामार्गावरील रस्ते वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली; तर खंडाळा घाटात रेल्वमार्गावर झाड पडल्याने पुण्याकडे येणार्या सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस, चिन्नई एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबून राहिल्या आहेत़ पुण्याहून मुंबईला जाणार्या डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस वाटेत थांबून ठेवण्यात आल्या होत्या़ कोकणातील सिंधदुर्ग, सावंतवाडी, राजापूर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, रोहा, ठाणे तसेच मुंबईच्या उपनगरांत बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली़ तसेच कर्जत, लोणावळा, खंडाळा, तळेगाव परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ अनेक ठिकाणी मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता़ गेल्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी आणि कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ७, महाबळेश्वर ७, सोलापूर ०़१, भिरा ८, रत्नागिरी ८, उस्मानाबाद २ मि़मी़ पावसाची नोंद झाली होती़ केरळ व परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तामिळनाडूत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षिण कर्नाटक, केरळ तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणीपूर येथे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
रायगडला वादळाचा फटका अलिबाग : रायगड जिल्ह्यात आज ताशी २४ कि़मी़ वेगाने वाहणार्या वादळी वार्याने मोठे नुकसान केले. त्यामुळे कर्जत, खोपोलीसह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तर काही ठिकाणी घरांची मोठे नुकसान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात घरांचे नुकसान
ठाणे : वादळी पावसाने जिल्ह्यातीलकल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ शहापूर, मुरबाड आणि माळशेज घाटातील गावपाड्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घरांची कौले, पत्रे उडाले असून मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत़ ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.
पावसाचे पाच बळी!
वीज कोसळून उस्मानाबाद, सांगली आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला़, तर सोलापूरमध्ये वादळी वार्याने विजेच्या तारा अंगावर पडून दोघांंचा मृत्यू झाला़ हापूसची नासाडी आधीच युरोप वारीवर गंडांतर आल्याने किंमत घसरलेला हापूस बिगर मोसमी पावसाच्या तडाख्याने पुन्हा घायाळ झाला आहे. बुधवारी दिवसभर वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे हापूसची झाडेही उन्मळून पडली आहेत. हापूसच्या बागेत वार्यामुळे कच्च्या हापूसचा सडा पडला आहे.