माझ्या हाती सत्ता देऊन बघा, शेतकरी मोर्चात राज ठाकरेंचे आवाहन, सरकारवर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 10:28 PM2018-03-11T22:28:04+5:302018-03-11T22:28:04+5:30
तुमच्या मनातील अंगार कायम ठेवा, मोर्चासाठी येताना सांडलेलं तुमच्या पायातील रक्त विसरु नका
मुंबई - ह्या सरकारचेच खिसे फाटलेले आहेत, ते तुम्हाला काय देणार असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टिका केली. हे सरकार तुमच्या तोंडाला पाने पुसणार आहे. सत्तेतील सरकारकडून काहीही होणार नाही, या सरकारकडून अपेक्षा काय ठेवता? त्यापेक्षा माझ्या हाती सत्ता देऊन बघा असे आवाहन राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. मुंबईमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते.
तुमच्या मनातील अंगार कायम ठेवा, मोर्चासाठी येताना सांडलेलं तुमच्या पायातील रक्त विसरु नका. केवळ मतांसाठी तुम्हाला लक्षात ठेवणाऱ्या या सरकारला धडा शिकवा आवाहनही राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
'संवेदनशीलपणाचे दर्शन'! विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून शेतकरी मोर्चा रात्रीच आझाद मैदानात धडकणार
आपल्या मागण्यांसाठी 165 किमीचे अंतर कापून लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांनी संवेदनशीलपणाचे दर्शन घडवले आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरु आहेत. मोर्चामुळं विद्यार्थांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीच मोर्चेकरी आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला आहे.
रविवारी शेतक-यांचे ‘लाल वादळ’ मुंबईत दाखल झाले. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. आज रात्री मोर्चेकरी सोमय्या मैदानात विश्रांती घेणार होते. आणि उद्या विधानभवनावर धडकणार होते, मात्र संवेदनशीलपणाचे दर्शन घडवत विद्यार्थांना त्रास नको म्हणून रात्रीच मोर्चेकरी आझाद मैदानावर धडकणार आहेत.
शेतकरी मोर्चाचा फडणवीस सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. आज रात्रीच किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्यांची उच्चस्तरीय बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी यांनी घेतली. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं. मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.
उद्या सोमवारी विधानभवनावर हा मोर्चा धडकण्याआधीच सरकारने मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षानेही पाठींबा दिला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या वतीने किसान मोर्चातील शेतकऱ्यांची विक्रोळीत भेट घेत स्वागत केलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असं आश्वासन महाजनांनी मोर्चेकऱ्यांना दिलं.
लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यावर, लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी यावेळी व्यक्त केला.
विधान भवनाला घेराव -
नाशिकमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतक-यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. शनिवारी रात्री ठाण्यात मुक्काम केल्यानंतर 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. किसान मोर्चा आज मुंबईत मुक्काम ठोकेल तर सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे.