Raj Thackeray: एकाच घरात राहून केवळ अजित पवारांच्या घरी धाड, सुप्रिया सुळेंच्या नाही; राज ठाकरेंनी विचारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 08:11 PM2022-04-12T20:11:24+5:302022-04-12T22:44:25+5:30
मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही असं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला दिले.
ठाणे – एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरावर धाड पडते सुप्रिया सुळेंच्या घरात का पडत नाही याचं उत्तर द्यावं. ज्या ज्या वेळेला शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले त्यानंतर नव्या नेत्यावर धाडी पडल्या. संजय राऊतांवर पवार खुश आहेत त्यामुळे पुढचं समजून जा अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी नेत्यांवर घणाघात केला. संपलेला पक्ष इथे येऊन बघा, मनसे विझलेला पक्ष नसून समोरच्याला विझवणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या आमदारांची बांधलेली मोळी आहे. त्याची रस्सी शरद पवारांच्या हाती आहे. ही माणसं दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेले तरी निवडून येतील असंही राज ठाकरे सांगितले.
गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणावर विरोधकांनी तोंडसुख घेतले. त्यावर उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तर सभा आयोजित केली आहे. या सभेला मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार आहे. हे गुप्तचर खात्याला कळालं. पण शरद पवारांच्या घरी एसटी कर्मचारी धडक देणार हे गुप्तचर खात्याला कसं कळालं नाही. पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी आपापले तारे तोडले. ते तोडल्यानंतर त्याचे उत्तर द्यायला पाहिजे असं वाटलं. पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं. कारण या पक्षांना काही बांधील पत्रकार आहेत ते पण त्याठिकाणी शिरतात आणि मूळ विषयाला भरकटवून टाकतात. वीज नाही म्हणून काही ठिकाणी सभा थांबवली असं कळालं पण मोबाईलवर सर्वकाही दिसतं. ही सभा जम्मूमध्येही मोठे स्क्रीन लावून दाखवली जात आहे. अनेक राज्यात ही सभा दाखवली जात आहे असं त्यांनी सांगितले.
"राज ठाकरे असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही"
तसेच माझ्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षाशी संबंधित पत्रकारांनी आपापला अजेंडा घेतला. भामट्या पत्रकारांमुळे अनेक चांगले पत्रकार मागे पडले. पत्रकार झाले तर काही संपादकही राजकीय पक्षाला बांधील झालेत. गुढीपाडव्याच्या सभेला अनेक पत्रकारांनी स्वत:चं एक भाषण आणलं होते. दीड वर्षापूर्वीच्या सभेला नरेंद्र मोदींवर बोलले. यावेळेलाही बोलतील. मी नाही बोललो, तेव्हा बोललो परत तशी वेळ आली तर बोलेन. इतरही विषय आहेत. बहुमत शिवसेना-भाजपाकडे आल्यानंतर ज्यारितीने मतदारांची गद्दारी केली. महाविकास आघाडी सरकार बनलं त्याआधी पहाटेचा शपथविधी झाला हेच मी बोललो त्यात भाजपाची स्क्रिप्ट कुठून आली. जे अवघ्या देशाला माहिती आहे तेच मी बोललो त्याची आठवण करून दिली. मला ज्या गोष्टींचा विरोध करायचा होता मी केला. विनाकारण भाषणाला विरोध करायचा असं ते म्हणाले.
वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं
तसेच मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. एका वर्षाच्या आत मी कोहिनूरमधून बाहेर पडलो. त्या कंपनीचा तपास सुरू झाला तेव्हा मला नोटीस आली आणि ईडीच्या कार्यालयात गेलो. ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही. ज्या गोष्टी मला नाही पटल्या ते जाहीरपणे बोललो. कलम ३७० रद्द केले त्यावर अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा मी पहिला होतो. या देशात समान नागरी कायदा आणा, या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा अशा २ मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण कराव्यात असं राज ठाकरेंनी सांगितले.