मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. देशभरातील एकूण संख्येपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने उच्चारल्या जाणाऱ्या किंबहुना शब्दावर खोचक टोला लगावला. (raj thackeray taunt uddhav thackeray)
राज्यात निर्बंध लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी राज ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ मागितला होता. परंतु, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्याशी झूमच्या माध्यमातून संवाद साधला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज ठाकरे यांनी याची माहिती मीडियाला दिली.
“अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या”
किंबहुना वापरलं तर चालेल ना?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी काल कॉल केला होता. लॉकडाऊनच्या संदर्भात मी त्यांना भेटीची विनंती केली होती. त्यांचा मला कॉल आला. त्याच्या आजूबाजूला कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. त्यांनी झूमवर बोलता येतील, असं ते म्हणाले. पुन्हा एकदा लॉकडाउन हे लोकांमध्ये पसरलं. रुग्णांची संख्या वाढतीये. किंबहुना… किंबहुना वापरलं तर चालेल ना?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थितांना विचारला आणि एकच हशा पिकला.
महाराष्ट्रात करोना वाढीची दोन कारण
महाराष्ट्रात कोरोना वाढीची दोन कारण आहेत. महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे इथे इतर राज्यातून येणारे लोक भरपूर आहेत. हे लोकं दररोज राज्यात येतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण मोजले जात आहेत. तर इतर राज्यात रुग्ण मोजले जात नाहीत. तिथेही अशीच परिस्थिती असणार, पण रुग्ण मोजले तर समोर येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत”
जिलेटिन असलेली गाडी ठेवली कोणी?
अनिल देशमुख यांचा राजीनामा हा महत्त्वाचा विषय नाही. महत्त्वाचा विषय मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी झालीय का? पोलिसांनी जी गाडी ठेवली ती कोणाच्या सांगण्यावरून ठेवली? कोणीतरी आदेश दिल्याशिवाय पोलीस हे कृत्य करणार नाही? जिलेटिन असलेली गाडी ठेवली कोणी? याची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय? की त्यांच्यावर राज्य आलंय कळत नाही असा टोलाही राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
दरम्यान, एकट्या राज्य सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही. कोरोना हा देशाचा विषय आहे. आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. लसीकरणही वाढवायला हवे. त्याला वयाचे बंधन नको. त्यातील टेक्निकल बाबी मला माहिती नाहीत, पण वयाचे बंधन नकोच. सर्वजण लॉकडाऊन पाळतील अशी आशा आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.