मुंबई- महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्क येथे शपथविधी होणार आहे. उद्धव ठाकरेंनीही राज यांना फोन करून शपथविधीचं आमंत्रण दिलं असून, राज ठाकरेंसुद्धा सहकुटुंब या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.आदित्य ठाकरेंना आमदारकी आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद ठाकरे कुटुंबात असे दुहेरी आनंदाचे क्षण आले आहेत. राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरातल्याच ‘कृष्णकुंज’मध्ये राहतात. या शपथविधीला राज ठाकरे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, असंही सांगितलं जात आहे. ठाकरे कुटुंबीय सुख-दुःखात एकमेकांच्या मदतीला पुढे येत असल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात राज ठाकरेंनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या गाडीचं सारथ्य करत मातोश्रीवर आणलं होतं. तर दुसरीकडे राज यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नालाही उद्धव ठाकरेसुद्धा सहकुटुंब उपस्थित होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरेसुद्धा उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातंय.या ऐतिहासिक सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी. देवेगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पंजाबचे कॅप्टन अमरेंद्र सिंग, भूपेश बघेल (छत्तीसगड), व्ही. नारायणस्वामी (पुद्दुचेरी), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) तसेच चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील 400 शेतकऱ्यांना विशेष निमंत्रित केले आहे. उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर असताना एका शेतक-याने मला तुमच्या शपथविधीला बोलवा, अशी विनंती केली होती. त्या शेतक-यास आवर्जून निमंत्रण पाठवले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने भाजपेतर पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा खा. शरद पवार यांचा प्रयत्न आहे.
Maharashtra Government: ठरलं! शपथविधीला राज ठाकरे जाणार; उद्धव ठाकरेंचं 'मनसे' निमंत्रण स्वीकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 2:52 PM